News18 Lokmat

सनातन समर्थक उमेदवारावरून चव्हाणांमध्ये मतभेद?

'सनातन समर्थक उमेदवाराबाबत पक्षाकडे तक्रार केली आहे. ही आमची अंतर्गत बाब आहे.'

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 09:47 PM IST

सनातन समर्थक उमेदवारावरून चव्हाणांमध्ये मतभेद?

अव्दैत मेहता, पुणे1 एप्रिल :  रत्नागिरी सिंधुदुर्ग चे काँग्रेसचे उमेदवार नवीचंद्र बांदिवडेकर यांच्याबाबतचा वाद अजुन शमलेला नाही. बांदिवडेकरांचे सनातनशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. नंतर अशोक चव्हाण यांनी त्यांना क्लिन चीट दिली होती. मात्र काँग्रसचे ज्येष्ठ नेते पृथ्विराज चव्हाण यांच्या नव्या वक्तव्याने त्यांचे आणि अशोक चव्हाण यांच्यातले मतभेद उघड झाले आहेत.

सनातन समर्थक उमेदवाराबाबत पक्षाकडे तक्रार केली आहे. ही आमची अंतर्गत बाब आहे. पक्ष श्रेष्ठी चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील असं मत पृथ्विराज चव्हाणांनी व्यक्त केलं. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान आहे. पृथ्विराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे बांदिवडेकरांवर टांगती तलवार असल्याचं बोललं जातेय.

प्रकाश आंबेडकरांचा आरोप

लोकसभेचा ज्वर आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर य़ांनी काँग्रेसचे 30 टक्के उमेदवार हे सनातनशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचेही नाव प्रकाश आंबेडकर यांनी घेतले.

काय आहे प्रकरण?

Loading...

नालासोपारा खटल्यातला आरोपी वैभव राऊत याला सोडवण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला होता त्यामध्ये नवीनचंद्र बांदिवडेकर सहभागी होते. नवीनचंद्र बांदिवडेकर हे भंडारी समाजाचे नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हात जोडून पक्षात बोलवलं आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची उमेदवारी दिली, अशी सूत्रांची माहिती आहे.

बांदिवडेकर यांनी वैभव राऊतला सोडवण्यासाठीच्या मोर्चामध्ये भाषण केलं होतं. वैभव राऊत हिंदुत्वाच्या रक्षणासाठी झटला, या शब्दात त्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. त्यांचं हे वक्तव्य 'दैनिक सनातन प्रभात' मध्ये छापून आलं आहे.

अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याने काँग्रेसवर टीका होतेय. पण बांदिवडेकर आणि सनातन संस्थेचा संबंध नाही. बांदिवडेकर 'सनातन'ची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

हा समाजाचा प्रश्न

नवीनचंद्र बांदिवडेकर हे अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आपला पूर्ण समाज वैभव राऊतच्या पाठिशी आहे, त्याला न्याय मिळायला हवा, अशा शब्दात त्यांनी वैभव राऊतची पाठराखण केली होती.

याबदद्ल News 18 लोकमत ने नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावर वैभव राऊत हा भंडारी समाजाचा असल्याने मी त्याची पाठराखण केली, असं त्यांनी म्हटलं आहे. कोर्टाने त्याला दोषी ठरवलं तर त्याला आमचा पाठिंबा राहणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, बांदिवडेकर यांना उमेदवारी देणं हे हिताचं ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी News 18 लोकमत शी बोलताना दिली आहे.

ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणी 'सनातन' संस्थेच्या सदस्यांना अटक झाली होती. त्याचप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेवर आरोप झाले आहेत, या संस्थेच्या साधकांना अटकही झाली आहे.



बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 09:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...