महेश तिवारी, बल्लारपूर (चंद्रपूर), 11 मार्च : प्रशस्त इमारत, आकर्षक रंगसंगती, सर्वत्र मनमोहक सजावट आणि भिंतीवर वन्यप्राण्यांची मनोहारी चित्रांमुळे बल्लारपुरातील नवीन बसस्थानकाचं रूपडंच पालटून गेलंय. प्रवाशांना बसण्यासाठी स्टीलचे चकचकीत बेंच आणि बसेस उभ्या करण्यासाठी बांधण्यात आलेले सोयीचे फलाट, प्रवेशद्वारावर वेळ दर्शविणारा 70 फूट उंचीचा देखणा मनोरा या सर्व गोष्टींमुळे याला बसस्थानक म्हणावं की एअर पोर्ट असा प्रश्न इथे आल्यावर पडतो. या सगळ्या बदलांमुळे बल्लारपूर बसस्थानकावर सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी वाढली आहे.