'सैराट'ची पुनरावृत्ती, भावाने गळा आवळून संपवलं बहिणीला!

खून केल्यानंतर या तरुणीचा घाईघाईने अंत्यविधी करण्यात येत असताना पोलिसांना एका निनावी फोन आला.

News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2018 08:04 AM IST

'सैराट'ची पुनरावृत्ती, भावाने गळा आवळून संपवलं बहिणीला!

बब्बू शेख,प्रतिनिधी

 मनमाड, 13 डिसेंबर : सैराट सिनेमात चित्रित केलेला प्रसंग रिअल लाईफमध्ये घडला आहे. बहिणीने प्रेम विवाह केल्यामुळे समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी होईल या भीतीने भावाने सख्या बहिणीचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहीवड इथं ही घटना घडल्याचं समोर आलं. खून केल्यानंतर या तरुणीचा-घाईघाईने अंत्यविधी करण्यात येत असताना पोलिसांना आलेल्या एका निनावी फोनमुळे या घटनेचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी खून करणाऱ्या भावाला बेड्या ठोकून गजाआड केलं.

देवळा तालुक्यातील दहीवड या छोट्याशा गावात प्रियांका सोनवणे ही तरुणी आपले  आई-वडील आणि भावा सोबत राहत होती. तिचं आत्येभावा सोबत प्रेम प्रकरण जुळल्यानंतर तिनं त्याच्या सोबत लग्न करून संसार थाटला. मात्र बहिणीच्या या कृत्यामुळे समाज आणि नातेवाईकांमध्ये बदनामी झाल्याची सल प्रियांकाचा भाऊ रोशन सोनवणे याच्या मनात टोचत होती अखेर संधी मिळताच त्यानं बहिणीचा गळा आवळून खून केला.

खून केल्यानंतर प्रियांकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करत तिचा घाईघाईने अंत्यविधी केला जात असतांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पोलिसांना या खुनाची माहिती दिली.

Loading...

पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन  मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला  होता. रिपोर्ट आला असून यात गळा आवळून खून करण्यात आल्याचं उघड झालं.

पोलिसांनी या प्रकरणी मयत मुलीचा भाऊ रोशन सोनवणे याला ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दोन महिन्यापूर्वीच मालेगाव शहरातच खोट्या प्रतिष्ठेसाठी आई-वडील आणि चुलत भावाने अशाच पद्धतीने एका तरुणीचा खून केल्यानंतर तिचा अंत्यविधी उरकत असताना या घटनेत ही एका निनावी फोन मुळे बिंग फुटलं होतं.

=============================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 07:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...