असा बनला 'सावित्री'चा पूल...

अवघ्या 10 महिन्यात पूल बांधून तयार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2017 02:55 PM IST

असा बनला 'सावित्री'चा पूल...

उदय जाधव, मुंबई

महाडच्या सावित्री नदीवरचा पूल अवघ्या 165 दिवसात बांधून पूर्ण झाला आहे. हा पूल झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचा प्रवासही काहीसा सुखकारक होईल. पण बातमी फक्त एका पुलाची नाही. ज्या पुलावरच्या अपघातानं महाराष्ट्राला हादरवून सोडलं तो पूल बांधल्याची आहे.

ज्या घटनेनं महाराष्ट्राला हादरून सोडलं, तो अपघात कसा विसरता येईल. मुंबई-गोवा हायवेवरचा महाड जवळचा पूल वाहून गेला आणि त्यात 40 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला. आता त्याच ठिकाणी अवघ्या 10 महिन्यात नवा कोरा पूल बांधून उभा आहे. सावित्री नदीवर उभा असलेला हा पूल 239 मीटर लांब आहे. 180 दिवसात तो पूर्ण होणं अपेक्षीत होतं पण तो 20 दिवस अगोदरच वाहतुकीसाठी तयार झालाय. या पुलासाठी जवळपास 35 कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. गडकरींनी वर्षभराच्या आत नवा पूल बांधण्याचं आश्वासन पूर्ण केलंय.

सावित्री नदीवरच्या या पुलावरून दोन्ही बाजूनं वाहातूक होऊ शकेल. त्यामुळे जुना पूल वापरण्याची गरज पडणार नाही. पावसाळ्यात अनेक वेळेस सावित्री नदी धोकादायक बनते. पण या पुलामुळे मुंबई गोव्याचा प्रवास विना अडथळा पार पडेल. तसंच नवा पूल असल्यामुळे प्रवासाला धोकाही नसेल. महाडच्या जवळ हा नवा पूल उभा राहीलाय. याच पट्ट्यात जवळपास 4 हजार 500 कोटी रूपयांची इतर कामेही हाती घेण्यात आलीत. त्यात महाड ते रायगड किल्ला, अंबडवे ते राजेवाडी, अलिबाग ते रेवदंडा अशा नव्या रस्त्यांच्या कामाचाही समावेश आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्याही काही भागाची डागडुजी केली जातेय.

सावित्री नदीवरचा अपघात महाराष्ट्रासाठी काळरात्र ठरला. गतवर्षी 2 ऑगस्टला सावित्री नदीवरचा ब्रिटीशकालीन पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्यात दोन एसटी बसेसही बुडाल्या. इतर काही वाहनेही वाहून गेली. नंतरचे दोन ते तीन दिवस  दोन्ही एसटींचा शोध सुरू होता. या दुर्घटनेत जवळपास 40 जणांना जीव गमवावा लागला. त्यातल्या काहींचे तर मृतदेहही मिळाले नाहीत. गोवा-मुंबई महामार्गावर असे जुने ब्रिलीशकालीन धोकादायक पूल 10 च्या जवळपास आहेत. सावित्रीवर नवा पूल बांधला गेला पण इतर जुन्या पुलांचा प्रश्न कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...