सिद्धार्थ गोदाम, लातूर
21 एप्रिल : लातूर महापालिकेत भाजपने काँग्रेसला चारी मुंड्या चित करत दणदणीत विजय मिळवलाय. 70 पैकी 35 मिळवत भाजपने बहुमत मिळवलंय तर संदोपसुंदीमुळे काँग्रेसचं संख्याबळ 33 वर घसरलंय. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता, त्यामुळे लातुरात भाजप एका अर्थाने झिरो टू हिरोच ठरलीय.
लातूर....एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला...इथल्या राजकीय गढीवर आतापर्यंत देशमुखांचंच नाव कोरलेलं होतं. पण यंदाच्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं देशमुखांना मोठा धक्का देत देशमुखांचा राजकीय बुरुजाला सुरुंग लावला. एकेकाळी निलंगेकर आणि देशमुख ही राजकीय जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या राजकारणात अग्रेसर होती.
पण आता तीच काँग्रेस देशमुख आणि चाकूरकर गटात विभागली गेली. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला. यशाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या काँग्रेसला मात्र उंबऱ्याचं माप ओलांडता आलं नाही. तरीही काँग्रेसचे नेते याचं दुषण भाजपला देताहेत.
2012 साली झालेल्या निवडणुकीत इथं भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. पण यावेळच्या निवडणुकीत भाजपनं झिरो ते हिरो असा नारा दिला होता. इतर पक्षातल्या नेत्यांचं दरम्यान भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं होतं. त्याचाही फायदा इथं भाजपला झाला आणि त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं.
लातूरमध्ये काँग्रेसची झालेली पिछेहाट ही अमित देशमुखांच्या आणि त्यांचे बंधू धीरज देशमुखांच्या उभरत्या नेतृत्वाला फार काही साजेशी नाही. विलासरावांनंतर त्यांचा वारसा चालवण्यासाठी आता देशमुखांना अधिक जनमाणसात जाऊन स्वतःला सिद्ध करावं हेही तितकंच खरं...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा