पंकज क्षीरसागर, परभणी
16 मे : आज मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली. काँग्रेसमुक्त भारत अशी मोहीमच मोदींनी हाती घेतलीये. पण, परभणीत भाजपनेच काँग्रेसला मदत केल्याची घटना घडलीये. भाजपच्या मदतीमुळे परभणी महापालिकेवर काँग्रेसच्या मिना सुरेश वरपुडकर यांची महापौरपदी निवड झालीये. तर काँग्रेसचेच सय्यद समी सय्यद साहेबजान यांची उपमहापौरपदी निवड झाली.
मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात सकाळी 10 वाजता महापौर आणि उपमहापौर पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. सभागृहात व्यासपिठावर पिठासीन अधिकारी पी. शिवाशंकर यांच्यासह मनपा आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती. 65 सदस्य असलेल्या महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी या सभेस 59 सदस्य उपस्थित होते.
शिवसेनेचे 5 तर राष्ट्रवादीचे अमोल पाथरीकर असे एकूण 6 सदस्य गैरहजर राहिले. दोन्ही पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौर पदासाठी काँग्रेसच्या मिना वरपुडकर यांना एकूण 40 मते मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेख अलीया अंजूम यांना 18 मते मिळाली. त्यामुळे मिना वरपुडकर 22 मतांनी विजयी झाल्याचे पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी घोषित केले.
उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे सय्यद समी सय्यद साहेबजान उर्फ माजूलाला यांना 32 मते मिळाली. तर भाजपच्या डॉ. विद्या पाटील यांना केवळ 8 मते मिळाली.
महापौर पदासाठी काँग्रेसला भाजपची 8 मतं मिळाली. मात्र उपमहापौर पदासाठी काँग्रेसने भाजपला सहकार्य केले नाही. महापौर आणि उपमहापौर काँग्रेसचेच झाल्याने मनपावरील वर्चस्व कायम राखत जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. दोन्ही पदांच्या निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा