शरद पवारांच्या बारामतीत आदर्श आचारसंहितेला गालबोट, मतदान केंद्रावरच तुंबळ हाणामारी

सातववस्ती येथे लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी (23 एप्रिल) मतदान केंद्रावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी बुधवारी (ता.24) रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 07:50 PM IST

शरद पवारांच्या बारामतीत आदर्श आचारसंहितेला गालबोट, मतदान केंद्रावरच तुंबळ हाणामारी

जितेंद्र जाधव (प्रतिनिधी)

बारामती, 25 एप्रिल- शहरातील सातववस्ती येथे लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी (23 एप्रिल) मतदान केंद्रावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी बुधवारी (ता.24) रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. शहर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज सातव यांच्यासह भाजपचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत सातव यांचाही समावेश आहे.

दिनकर धोंडीबा काटे (रा. माळेगाव रोड, शिवाजीनगर, कसबा, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सूरज दत्तात्रय सातव, गणेश लहू सातव, संतोष रामचंद्र जाधव (रा. कसबा, बारामती), गौरव उर्फ एक्या हनुमंत सातव (रा. माळेगाव रोड, बारामती) व विकी चंद्रकांत जामदार (रा. गुणवडी रोड, बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी (ता. 23) रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे या केंद्रावर मतदान प्रतिनिधी म्हणून काम करून घरी जात असताना हनुमान मंदिराजवळ आले असताना आरोपींनी पाठिमागून पळत येवून त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले. गौरव सातव याने पाठीवर मारत खिशातील 1700 रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गणेश लहू सातव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत (नाना) सातव (रा. सोनई बंगला, कसबा, बारामती), अजित साळुंखे (रा. साळुंकेवस्ती, जामदार रोड, बारामती), जाधव (पूर्ण नाव नाही, रा. तांदूळवाडी वेस, बारामती), नवनाथ भोसले (पूर्ण नाव नाही, रा. शिवाजीनगर, कसबा, बारामती) या चौघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळी सातववस्ती येथे ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मतदान संपल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या भावाला शिविगाळ, दमदाटी केली. तुझे जास्त झाले आहे, तुला सोडणार नाही, असे म्हणून ते फिर्यादीच्या भावाला मारहाण करत असताना फिर्य़ादी तेथे सोडविण्यासाठी गेले असताना आरोपींनी त्यांनाही शिविगाळ, दमदाटी करून मारहाणीचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी हे सूरज सातव यांना घरी सोडण्यासाठी जात असताना फडतरे यांच्या विहिरीजवळ आले असताना आरोपींनी जमाव करून फिर्यादीला मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची साखळी बळजबरीने ओढून खिशात घातली असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान परस्परविरोधी या दोन तक्रारींसह पोलिसांकडूनही दोन्ही गटातील नाना सातव व गणेश सातव यांच्या विरोधात भादंवि कलम 160 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी किशोर वीर यांनी याबाबत फिर्य़ाद दिली. सातववस्ती मतदान केंद्रावर फिर्य़ादी हे बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावत असताना नाना व गणेश सातव यांनी मतदानाच्या कारणावरून सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी भांडत सार्वजनिक शांततेचा भंग केला असल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.

Loading...


VIDEO : प्रकाश आंबडेकरांची संघावर सडकून टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 07:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...