S M L

बैलगाडा शर्यतीवरचं बंदीचं ग्रहण कधी सुटणार ?

राष्ट्रपतींच्या अध्यादेशानंतर बैलगाडा शर्यतीवरची बंदी खरंतर उठली होती. बैलगाडा प्रेमी शर्यतीच्या तयारीलाही लागले होते. पण अजय मराठे नावाचे प्राणीप्रेमी पुन्हा हायकोर्टात गेले आणि बैलगाडा शर्यतींवर पुन्हा कोर्टाच्या बंदीचं ग्रहण बसलं. पांरपारिक बैलगाडी शर्यतींवरचं हे बंदीचं ग्रहण नेमकं कधी आणि कसं सुटणार हाच खरा प्रश्न आहे.

Chandrakant Funde | Updated On: Aug 16, 2017 07:26 PM IST

बैलगाडा शर्यतीवरचं बंदीचं ग्रहण कधी सुटणार ?

रायचंद शिंदे, प्रतिनिधी, जुन्नर

प्राणीमित्र संघटनेच्या दबावामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती कायद्याच्या कचाट्यात अडकल्यात. राष्ट्रपतींनी बैलगाडा शर्यत अध्यादेशाच्या विधेयकावर सही केल्यानंतर बैलगाडा मालकांमध्ये आनंदाच वातावरण होतं मात्र हा आनंद काही काळातच मावळला. ग्रामीण भागातील ग्रामदैवतांच्या यात्रा - जत्रा म्हटलं की घाटात धावणारे बैलगाडे आणि लोकनाट्य तमाशा हे समीकरण वर्षानूवर्षे टिकून होतं मात्र प्राणी मित्रांच्या मागणी नंतर हायकोर्टाच्या आदेशाने मागील 3 वर्षांपासून घाटात धावणारे बैलगाडे दिसेनासे झाले आणि यात्रांमधला आत्माच निघून गेल्यात जमा झाला होता. काही दिवसांपासून तामिळनाडूच्या जलिकट्टू साठी रस्त्यावर उतरलेल्या समर्थकानंतर महाराष्ट्रातही बैलगाडा मालक पेटून उठले होते. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींची वक्तव्य तर काही ठिकाणी बैलगाडा मालकांचा आक्रोश उभ्या महाराष्ट्राने या निमिताने पाहिला. काही काळ प्राणीमित्र आणि संघटना यांच्यात वादवादीही झाली. प्रकरण पुन्हा एकदा हायकोर्टात पोहचलं.

निवडणुकात विरोधी पक्षानं शब्द दिला की सत्तेत आल्यावर आम्ही शर्यती सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, मात्र तब्बल 3 वर्षांनी राज्य आणी केंद्र सरकारने बैलगाडा मालकांच्या बाजूने न्यायालयात आपली बाजू मांडली आणि शर्यतींचा मार्ग खुला झाला. नव्या राष्ट्रपतींनीही पदाची सूत्रे हाती घेतल्यावर पहिल्याच दिवशी या अध्यादेशावर सही केली. गणेशोत्सवात या बैलगाडा शर्यती सुरू होण्याची चिन्हे दिसूही लागली होती. मात्र प्राणीप्रेमींनी बैलगाडा शर्यतीत बैलांचा छळ होत असल्याचा मुद्दा पुढे करत हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टानेही शर्यतीसाठीचे नियम बनवल्याशिवाय परवानगी नाहीच असा आदेश दिला शर्यती सुरूच होण्याआधीच त्याला बंदीचं ग्रहण लागलं.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ तर संगमनेरसह सातारा सांगली जिल्ह्यातही बैलगाडा शर्यतींची परंपरा आहे. पण न्यायालयीन बंदीमुळे मागील 3 वर्षांपासून गावजत्रा शर्यतीविना ओस पडल्या आहेत. शर्यती बंद झाल्याने बैलांच्या किमती कमालीच्या घटल्या. पण दावणीला बांधलेल्या बैलांना पोसायचं तरी कसं ? अश्या विवंचनेत शेतकरी आहे. मागील दीडशे वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा 3 वर्षांपासून कोर्टाच्या आदेशाने बंद झालीये. त्यामुळे बैलगाडा मालक कमालीचे संतप्त आहेत.

शर्यतीला धावणारे बैल प्रामुख्याने सांगली, सांगोला, जत, पंढरपूर या भागातून लहान वयातच खरेदी केले जातात. आणि शर्यतीसाठी त्यांची चांगली तयारीही केली जाते. खिलार जातीच्या या बैलाची पूर्ण वाढ झाल्यावर मोठी किंमत येत असल्याने अलीकडे अनेक व्यापारी याच व्यवसायात पडले आहेत. मात्र या बैलांना पदरमोड करून सांभाळायचं कसं, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे आणि पुढे अजून किती दिवस या शर्यती बंद राहणार याकडे बैलगाडा प्रेमी डोळे लावून बसणार आहेत.

Loading...
Loading...

मागील काही दिवसात तर यात्रा-जत्रा सोडाच पण पुढाऱ्याच्या वाढदिवसालाही या शर्यती होत होत्या. घाटात जमणारे बैलगाडा मालक आणि शर्यत शौकिनांच्या तोंडी बैल एके बैल हा एकच विषय चर्चिला जायचा. लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या भागातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचीही या शर्यती सुरू करण्याची आश्वासनं असायची. पण, पुढे पुन्हा जैसे थे व्हायचं...बैलगाडा मालकांनी पेटा आणि प्राणीमित्र संघटनेच्या विरोधात राज्यभरात आंदोलन केली. पण न्यायालतात भक्कम पुरावे दिले जात नसल्याने तारीख पे तारीख असंच चित्रं सुरु होतं. राष्ट्रपतींच्या अध्यादेशानंतर हा विषय थांबेल असं वाटलं होतं. पण अजय मराठे नावाचे स्वयंघोषित प्राणीप्रेमी पुन्हा हायकोर्टात गेले आणि बैलगाडा शर्यतींवर पुन्हा कोर्टाच्या बंदीचं ग्रहण बसलं

 

प्राणीमित्र संघटनेच्या सर्व मागण्या बैलगाडा मालक ऐकायला तयार होते. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि नियमानुसार या शर्यती होणार होत्या मात्र प्राणी मित्रानी आपली भूमिका का बदलली हे मात्र बैलगाडा मालकांना समजेनासं झालंय. खरंतर बैलगाडा मालक आपल्या बैलांना जीवापाड जपतात. त्यामळे छळाचा प्रश्नच येत नाही. शिवाय बैलाच्या मृत्यूनंतर त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचा माणसाप्रमाणेच दशक्रिया विधी करून घरातील सर्वजण मुंडणही करतात. शिवाय या कार्यक्रमाला बैलगाडा प्रेमींना निमंत्रित करून गावजेवणही दिल जातं. या सर्वांचा प्राणी मित्रांना एकच सांगावा आहे की, आम्ही आमच्या बैलाचा छळ नाही हो करत. पण हे स्वयंघोषित प्राणीप्रेमी आपला हेका कायम ठेवत पुन्हा कोर्टात धाव घेतात.

शर्यतीदरम्यान, आम्ही खरोखरच बैलांचा छळ करत असू तर आम्ही एवढा खर्च का करू, असा सवालही या मंडळींनी केला आहे. पूर्वी, शर्यतीवेळी बैलांना थोडीफार मारहाण होतही असेल पण यापुढे असं काही होणार नाही, अशी लेखी हमी ही मंडळी द्यायलाही तयार आहेत. घाटामध्ये तुम्ही या पहा, हवंतर सीसीटीव्ही लावा पण आमचं थोडं ऐका असंच बैलगाडा प्रेमींचं म्हणणं आहे. पण ऐकतील ते प्राणी प्रेमी कसले ?

तामिळनाडूच्या जलिकट्टूसाठी रस्त्यावर उतरलेल्या समर्थकांनी संपूर्ण तामिळनाडू ढवळून निघाला होता. तिथे जल्लीकट्टू स्पर्धा पुन्हा सुरू झाली. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला लागलेलं बंदीचं ग्रहण मात्र, काही केल्या सुटायला तयार नाहीये. निवडणुका आल्यावर चर्चा होईल. आश्वासनं मिळतील. शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी राजीनाम्याची स्टंटबाजीही होईल, पण शर्यतीसाठीचे साधे नियम बनवून घेण्यासाठीही या राजकारण्यांना सरकारवर दबाव टाकता येत नाहीये. किंवा या बंदीविरोधात एकत्र येऊन कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडता येत नाही. बैलांचा छळ होत असेलही पण तो सरसकट होत नाही हे जर निदर्शनास आणून दिले तर हे बंदीचं हे ग्रहण कायमस्वरूपी सुटू शकतं. यासाठी सकारात्मक विचार होण्याची गरज आहे. प्राणीमित्र बैलगाडा प्रेमी आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकत्र बसून हा प्रश्न मिटवणे गरजेचं आहे. बैलगाडी शर्यतीवरची बंदी उठवण्यासाठी सरकारने वेळीच पुढाकार घेतला नाहीतर पुन्हा बैलगाडा प्रेमींची आंदोलनं बघायला मिळतील यात शंका नाही. कारण आतातर कुठे बैलगाडा शर्यतीचा हंगाम सुरू होणार होता. पण त्याआधीच हायकोर्टाने बंदीचा बडगा उगारल्याने बैलगाडा प्रेमींच्या उत्साहावर पुन्हा विरजण पडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 16, 2017 07:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close