26 डिसेंबर : बदलापुरात तब्बल २ कोटी रुपये खर्च करून टेक्निकल स्कुलची इमारत २ वर्षांपासून बांधून तयार आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे इमारतीला पूर्णत्वाचा दाखलच मिळत नसल्यानं शाळेला कुलूप लावलं आहे. त्यामुळे टेक्निकलच्या शेकडो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. तर या समस्येमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय
अपुरी पडत असलेली साधन सामुग्री या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा अडथळा बनलीय. बसायला बेंचेस नसल्यानं विद्यार्थ्यांवर जमिनीवर बसून अभ्यास करण्याची वेळ आली आहे. इमारतीला पूर्णत्वाचा दाखलच मिळत नसल्यानं गेल्या 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी असा खेळ केला जातोय.
बांधकामासाठी बदलापूर पालिकेची परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागानं परस्पर शाळेची इमारत बांधली होती. त्यामुळे आधी बांधकाम परवानगी आणि नंतर इमारत पूर्णत्वाचा दाखल देण्यात येईल असं कारण बदलापूर महापालिकेलडून देण्यात आलं आहे. याच शासकिय नियमांच्या फेऱ्यात आता ही शाळा अडकली आहे. त्यामुळे अजून काही महिने तरी हे टेक्निकल स्कूल सुरू होणार नाही हे स्पष्ट आहे.
ज्या खाजगी शाळेत हे विद्यार्थी शिकतात तिला शासनकडून महिना २४ हजार भाडं मिळत आहे. पण मग शाळेची इमारत तयार असताना आम्हाला तिथे का शिकू दिलं जात नाही असा प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहेत. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करून या शाळेच्या इमारतीचे प्रतिकात्मक उदघाटन देखील केलं होतं. मात्र पुढे काहीच न झाल्याने आता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा