लातूरमध्ये खाकी वर्दीला पुन्हा काळीमा,गुजरातच्या व्यापाऱ्याचा पोलीस कोठडीत मृत्यू

लातूरमध्ये खाकी वर्दीला पुन्हा काळीमा,गुजरातच्या व्यापाऱ्याचा पोलीस कोठडीत मृत्यू

खाकी वर्दीविरोधातला संताप राज्यभर व्यक्त होत असतानाच लातूरच्या या एमआयडीसी पोलिस स्टेशनमधले पोलिस कोठडीतला आणखी एक मृत्यू पचवण्यात दंग होते. News18लोकमतनं याचा पर्दाफाश केला.

  • Share this:

वैभव सोनावणे, लातूर, 20 नोव्हेंबर : आधीच सांगलीतील पोलिसांच्या कृतीनं खाकी वर्दीच्या इभ्रतीच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या. खाकी वर्दीविरोधातला संताप राज्यभर व्यक्त होत असतानाच लातूरच्या या एमआयडीसी पोलिस स्टेशनमधले पोलिस कोठडीतला आणखी एक मृत्यू पचवण्यात दंग होते. News18लोकमतनं याचा पर्दाफाश केला.

घडलं असं, 11 आॅक्टोबर 2017 रोजी गुजरातच्या मेहसाणा इथे  हवाला प्रकरणात लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी नरेंद्र हडियाल आणि हिम्मतसिंग हडियाल या दोघांना ताब्यात घेतलं. 11 तारखेला यांना ताब्यात घेतलं होतं. तेव्हापासून जवळपास दोन दिवस कुठल्याही कस्टडीशिवाय किंवा मॅजिस्ट्रेटकडे न कळवता यांना ताब्यात ठेवण्यात आलं. 13 तारखेला अटक दाखवली. 6 लाखाच्या मोबदल्यात हिम्मतसिंग यांना सोडण्यात आलं पण नरेंद्र हडियालला घेऊन पोलिस लातूरला आले.

हवालाच्या केसमधून सुटका करण्यासाठी लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी तब्बल 25 लाखांची मांडवली केल्याचा हिम्मतसिंग यांचा दावा आहे. त्यांच्याकडे पुरावा असल्याचं ते म्हणतात.

दरम्यान कोठडीत असलेल्या नरेंद्र यांच्या सुटकेसाठी पोलिसांनी 10 लाखांची मागणी केली. त्याची जुळवाजुळ करत असतानाच पोलिसांनी हिम्मतसिंग यांना तातडीनं लातूरला बोलवून घेतलं.  हिम्मतसिंग हडियाल म्हणाले, 'मला फोन आला आणि सांगितलं की तुमच्या भावाला हार्टअटॅक आलेला आहे. तुम्ही लवकर लातूरला या. मी सांगितलं की माझं बोलणं करून द्या तर माझं बोलणंही करून देत नव्हते.

नरेंद्र यांना पोलिस कोठडीत हार्टअटॅक आल्याचं कळताच हिम्मतसिंग लातूरात दाखल झाले. तेव्हा समोर होता नरेंद्र यांचा मृतदेह  आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे नरेंद्र यांचा मृत्यू हार्टअटॅकनं नाही तर अॅसिडमुळे झाल्याचं पोस्टमोर्टेममधून समोर आलं.

पण एवढ्या गंभीर आरोपानंतरही पोलीस मात्र मूग गिळून गप्प आहेत. नरेंद्र हडियालच्या कोठडीतील मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून हिम्मतसिंग यांनी जंगजंग पछाडलं पण कोणीच दाद देईना.

सांगली प्रकरणात आधीच पोलिसांच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली गेलीयत. त्यात लातूरच्या या धक्कादायक प्रकारानं पोलिसांच्या गुन्हेगारीचा पुन्हा पर्दाफाश झालाय. एकूणच काय तर  पोलिस गुन्हे करण्यात आणि ते पचवण्यात अट्टल गुन्हेगांरानाही लाजवेल इतके तरबेज झाल्यानं वर्दीची मान शरमेनं खाली गेलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 12:12 PM IST

ताज्या बातम्या