S M L

एक गाव एक लग्न तिथी, हिंगोलीमध्ये स्तुत्य उपक्रम

लग्नातला भरमसाठ खर्च टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या पळसगावनं एक आदर्श उपक्रम सुरू केलाय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 16, 2018 02:03 PM IST

एक गाव एक लग्न तिथी, हिंगोलीमध्ये स्तुत्य उपक्रम

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली,16 एप्रिल : शेतकऱ्यांना सर्वात जास्त चिंता असते मुलीच्या लग्नाची. या चिंतेत अनेक शेतकरी आत्महत्या सुद्धा करतात . मात्र हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव येथील नागरिकांनी एक स्तुत्य उपक्रम राबवत शेतकऱ्यांची ही चिंता दूर केली आहे.

सततचा दुष्काळ, नापिकी आणि शेतमालाला न मिळणारा भाव. यामुळे शेतकरी नेहमी हैराण असतोच. त्यातच मुलीचं लग्न म्हटलं की अजूनही शेतकऱ्याचं कंबरडं मोडतं. लग्नातला भरमसाठ खर्च टाळण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातल्या पळसगावनं एक आदर्श उपक्रम सुरू केलाय. गेल्या 10 वर्षांपासून या गावात एक गाव एक लग्न तिथी हा उपक्रम राबवला जातो. यामध्ये मुलीच्या वडिलांना शक्य असेल तेवढीच रक्कम तो मंडळाकडे जमा करतात. मग उरलेला सगळा खर्च गावातल्या विवाहमंडळातर्फे केला जातो.

एकाच तिथीला ही लग्नं लावली जातात. अगदी वर्षभरात गावात ज्या मुलींची लग्न ठरली आहेत. त्यांची लग्नही या सोहळ्यात पार पडतात. विशेष म्हणजे यासाठी पाहुणचारात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. अगदी वऱ्हाडी मंडळींच्या भोजनापासून ते मंडप, बँड...सगळं काही थाटामाटात केलं जातं. यंदाही नुकताच हा सोहळा झालाय. त्यात गावातल्या 10 मुली आपल्या सासरी गेल्यात.

आपले वडील सगळ्यात मोठ्या चिंतेतून सुटल्याचं पाहून नवऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर सासरी जाताना समाधान असतं. आपल्याही गावात असाच विवाह सोहळा आयोजित करणार असल्याचं नवरदेवाचे मित्र सांगतायेत.

महत्त्वाचं म्हणजे या सोहळ्यासाठी कोणतीही शासकीय मदत किंवा एनजीओची मदत घेतली जात नाही. हा पळसगाव पॅटर्न जर राज्यात इतरही गावांमध्ये राबवला गेला तर शेतकऱ्यांची चिंताही कमी होईल आणि मुख्य म्हणजे लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close