जादूटोणाविरोधी विधेयकाचा विधानपरिषदेत मार्ग मोकळा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2013 10:48 PM IST

black magik acs16 डिसेंबर : विधानसभेनं मंजूरी दिल्यानंतर आज जादूटोणाविरोधी विधेयक विधानपरिषदेत मांडलं गेलं. भाजपनं या विधेयकाला पाठिंबा दिल्यानं मंगळवारी होणार्‍या चर्चेनंतर विधेयक मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झालाय. या विधेयकावर विरोधकांमध्येच फूट पडली आहे.

विधानसभेत मंजूर झालेला मसुदा मान्य असल्याचं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता विनोद तावडे यांनी म्हटलंय. तर शिवसेनेनं या विधेयकाला तीव्र विरोध केला आहे. उद्या परिषदेत हे विधेयक मंजूर झालं तर गेल्या 18 वर्षांपासून रखडलेला जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात येणार आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्र अंनिसनं विदेशातून आर्थिक मदत घेतल्याचा आरोप केला, पण गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रामदास कदमांच्या आरोपात तथ्य नसल्याचा निर्वाळा दिलाय. तर काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी शिवसेनेचे नेते असे बेछूट आरोप करून सभागृहाची दिशाभूल करत असल्याची टीका केली.

Loading...

जादूटोणा विरोधी विधेयकावर विधान परिषदेत राहिलेली चर्चा मंगळवारी होणार आहे. शुक्रवारी हे विधेयक विधानसभेत मंजूर झालं. पण आधी सहकार्याचं आश्वासन देऊन नंतर विरोधकांनी ज्या पद्धतीनं विधेयकाला सभागृहात विरोध केला, त्यावरून त्यांना खरंच विधेयकाला पाठिंबा द्यायचा होता का हा प्रश्न उरतो.

जादूटोणा, नरबळी, भानामती, करणी, भूत उतरवणं या आणि अशाच इतर अंधश्रद्धतेून निर्माण झालेल्या अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं आधी जादूटोणा विरोधी कायद्याचं विधेयक आणलं आणि नंतर ते विधानसभेत मांडलं. जाहीरपणे या विधेयकाला पाठिंबा देणारी भूमिका घेऊनही शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला.

विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी तर विधेयकावर भाषणसुद्धा केलं नाही, आणि ते चर्चेच्या वेळेस हजरही राहिले नाहीत. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगुंटीवार यांनी हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडं पाठवण्याची मागणी केली. तर शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई यांनी हे विधेयक हिंदूविरोधक असल्याचा आरोप केला, तसंच त्याचा ऍट्रोसिटी कायद्याप्रमाणे दुरुपयोग होईल अशी भूमिकाही मांडली.

विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ही गोंधळाची परिस्थिती सांभाळण्यासाठी संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 'फ्लोअर मॅनेजमेंट' अत्यंत चोख केलं होतं. आधी राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांनी सरकारच्या वतीने विधेयकातल्या दुरुस्त्यांचा प्रस्ताव मांडला. नंतर काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांनी 'सेव्हिंग क्लॉज'ची सुधारणा मांडली. या दुरुस्त्या आणि सुधारणा मंजूर होत असताना विरोधकांचा गोंधळ जास्त वाढला. विरोधी बाकावरचे बहुतेक आमदार वेलमध्ये उतरले. समाजकल्याण मंत्री शिवाजीराव मोघे यांनी विधेयक अंतिम मंजुरीसाठी मांडले. उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी लगेचच आवाजी मतदान घेऊन विधेयक मंजूर करून घेतले. आधी चर्चा आणि एकमत झालं असताना विरोधाची गरज नव्हती असं सरकारचं म्हणणं पडलं.

विधेयकाला पाठिंबा देता देता यूटर्न घेऊन विरोधकांनी पुन्हा एकदा धार्मिक भावनांचा मुद्दा उपस्थित केला. त्याला सरकारतर्फे उत्तरही देण्यात आलंय. जादूटोणाविरोधी विधेयकावर आता विधानपरिषदेत मांडलं गेलंय, आणि इथेही विरोधक गोंधळ घालणार हे स्पष्ट दिसतंय.

शिवसेना-भाजपचा विरोध

- एकनाथ खडसे यांचे भाषण नाही, चर्चेच्या वेळेस गैरहजर

- देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगुंटीवार यांची विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी

- सुभाष देसाई यांचा विधेयक हिंदूविरोधक असल्याचा आरोप, ऍट्रोसिटी कायद्याप्रमाणे दुरुपयोग होण्याची भीती

सरकारची चाल

- अशोक पवार यांनी विधेयकातल्या दुरुस्त्यांचा प्रस्ताव मांडला

- वीरेंद्र जगताप यांनी सेव्हिंग क्लॉजची सुधारणा मांडल्या

- शिवाजीराव मोघेंनी विधेयक अंतिम मंजुरीसाठी मांडलं

- उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी आवाजी मतदानाद्वारे विधेयक मंजूर करून घेतलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2013 09:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...