आठवलेंवर हल्ला करणारा तरूण निघाला त्यांचाच कार्यकर्ता, गुन्हा दाखल

आठवलेंवर हल्ला करणारा तरूण निघाला त्यांचाच कार्यकर्ता, गुन्हा दाखल

.आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा रिपाइंचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे

  • Share this:

गणेश गायकवाड,प्रतिनिधी

अंबरनाथ, 9 डिसेंबर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना शनिवारी रात्री मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी प्रवीण गोसावीला अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रवीण गोसावीवर मुंबईच्या जे .जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.आठवले यांच्यावर हल्ला करणारा तरुण हा रिपाइंचाच कार्यकर्ता असल्याचं समोर आलं आहे. रिपाइंच्या अनेक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला होता. तसंच तो अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहे. रामदास आठवले यांनी कोणतीही भूमिका घेतली ती प्रवीणला पटत नव्हती. या रागातून त्याने शनिवारी आठवले यांच्यावर हल्ला केला.


दरम्यान, माझ्या वाढत्या लोकप्रियतेमुळे माझा दुःस्वास करणाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला असल्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केली. पोलिसांनी पुरेशी सुरक्षा व्यवस्था न ठेवल्यानं हा प्रकार घडल्याचंही ते म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.

अंबरनाथसह ठिकठिकाणी बंद आणि आंदोलनं

तर दुसरीकडे रामदास आठवले यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याचे पडसाद आज विविध ठिकाणी उमटलेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे. अंबरनाथमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.

अंबरनाथ, उल्हासनगर, कसारा, कल्याण, शहाड याठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करत सकाळी दुकानं आणि रिक्षा बंद केल्या. रिक्षा बंद झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.वांद्रे इथंही पुकारला बंद

आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. या कार्यकर्त्यांनी आज वांद्रे पूर्व इथं दुकानं बंद केली. आठवले यांच्या घराबाहेर मोठ्या कार्यकर्ते जमा झाले आहेत. तसंच पोलिसांचाही मोठा फौजफाटा आहे.

काय आहे प्रकरण

अंबरनाथ पश्चिममध्ये विको नाका परिसरात नेताजी मैदानात संविधान दिनानिमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रामदास आठवले आले होते. यावेळी आठवले यांनी जवळपास अर्धा तास भाषण केलं. भाषण आटोपल्यानंतर रामदास आठवले स्टेजवरून खाली उतरत होते. त्यावेळी प्रवीण गोसावी नावाचा तरुण त्यांच्याजवळ गेला. या तरुणानं आठवले यांच्याशी हुज्जत घातली. काही कळण्याच्या आता या प्रवीणने अचानक रामदास आठवले यांच्यावर हल्ला केला.त्यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या आठवले यांच्या सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.हा प्रकार घडल्यानंतर तिथे उपस्थिती असलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाला पकडलं आणि बेदम चोप दिला.

====================

रामदास आठवलेंवर हल्ला करणाऱ्या तरुणाची ओळख पटली!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2018 04:30 PM IST

ताज्या बातम्या