S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दहावीत 94 टक्के मिळवूनही अमृता करतेय घरकाम

घरातल्या दारिद्र्यामुळे अकरावीत प्रवेश न घेता मुंबई गाठून मोलकरणीचं काम करण्याची वेळ तिच्यावर आली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2017 11:48 AM IST

दहावीत 94 टक्के मिळवूनही अमृता करतेय घरकाम

दिनेश केळुस्कर, 06 जुलै : यंदा दहावीत 94 टक्के गुण मिळवून ती गावातच नव्हे तर  पंचक्रोशीत पहिली आलीय. पण घरातल्या दारिद्र्यामुळे अकरावीत प्रवेश न घेता मुंबई गाठून मोलकरणीचं काम करण्याची वेळ तिच्यावर आली.

रत्नागिरीतल्या धामापूर गावातल्या पिक अप शेडवर सध्या अमृता शिगवणच्या अभिनंदनाचे बॅनर झळकतायत !  पण दहावीत 94% गुण मिळवून पंचक्रोशीत पहिली आलेल्या या अमृताला झाकोळून टाकलंय ते तिच्या दारिद्र्याने !  घरची परिस्थितीच नसल्यामुळे अकरावीचा विचार सोडून देउन  तिच्या आईने  तिला मोलकरणीचं काम करण्यासाठी मुंबईला पाठवलं.

अमृता म्हणते, 'मी मुंबईला कामाला गेली होती दोन महिने काम केलं घरकाम करतात ना मुली तस केलं. माझी मामी आहे तिच्या ओळखीच्यांकडे बेड वगैरे सीधे करायचे , इस्त्री करायची , भाजी चिरून द्यायची.'अमृताचा गावातर्फे सत्कार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणपत भायजे यांनी तिला सध्या गावी आणलंय . अमृता आलीय खरी पण तिला पुढे शिकवणार कसं हा प्रश्न तिच्या आईसमोर आहे .

अमृताची आई अनिता सांगते, ' तिला आता कामालाच आम्ही दवडलेली होती . शिकवायची नव्हती म्हणून दवडली होती पण काय करणार आता. ती म्हणते शिकायचं मग आता आमचा नाविलाज. आमचं तसं भागत नाही. आता आठ माणसं आम्ही दोन मुली शिकायला परत. तसं बघायला गेलं तर कपडा सुध्दा मोठीला घेतलेलाच नव्हता वर्षभर. शाळेचा म्हणजे आठवीला मी शिवला होता तो दहावीपर्यंत पुरवला तिने .

चार बहिणीत अमृता मोठी. शेतमालकाचा वाटा देऊन उरलेल्या तांदुळात कसंबसं आठ माणसांचं दोन वेळचं अन्न भागवायचं आणि मिळाली तर मजुरी! अशी टोकाची गरिबी असलेली अनेक कुटुंबं रत्नागिरीतल्या ग्रामीण भागात आहेत . त्यामुळे मुलींना जेमतेम शिकवून घरकामाला पाठवून देण्याशिवाय या कुटुंबियांकडे पर्याय नाहीय.

तिथले  सामाजिक कार्यकर्ते गणपत भायजे म्हणतात, 'ही रुढीच चाललीय या परिसरामध्ये सगळ्या बऱ्याचश्या अशा मुली या घरकाम करतात. इथे या पंचक्रोशीत एक टक्का सुध्दा मुली ग्रॅज्युएशन किंवा बारावीच्या नंतर शिकलेल्या दिसणार नाहीत तुम्हाला आणि मुलं सुध्दा दिसणार नाहीत.इथले लोक राजकारण्यानी गुंतवून ठेवलेले आहेत .राजकारणी सांगतील तसं वागतात. राजकारण्यांना कधी या मुलांनी  शिकलं पाहिजे, त्यांनी व्यावसायिक शिक्षण केलं पाहिजे त्यांनी नोकरी केली पाहिजे असं  वाटत नाही. फक्त मतांसाठी या लोकांचा वापर करतात.'

बेटी बचाओ  बेटी पढाओ या मोहिमेचा खूप गाजावाजा केला जातो. मुलींच्या शिक्षणाच्या अनेक योजना सरकारी पातळीवर घोषित केल्या जातात पण राज्याच्या अनेक भागात अमृता शिगवण सारख्या कित्येक अमृता आहेत ज्यांना शिक्षण दूरच पण दोन वेळचं अन्नही पोटभर परिस्थितीमुळे  मिळत नाही. म्हणूनच सरकारी यंत्रणानी मुलींच्या शिक्षणासाठी अशा मुलींना दत्तक घेण्याची योजना राबवायला हवी आणि खाजगी संस्थांवर त्याची सक्ती करायला हवी.

अमृताला सायन्स घेऊन नंतर बॅन्किंग क्षेत्रात जायचंय .म्हणूनच असं शिकून आपल्या कुटुंबाची गरिबी दूर करण्याची  जिद्द बाळगणाऱ्या अमृताला आपण सर्वांनी साथ द्यायला हवी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2017 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close