News18 Lokmat

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, युतीचा निर्णय लवकर घेण्याचा आग्रह!

उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. तर भाजपने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला होता.

News18 Lokmat | Updated On: Jan 30, 2019 04:36 PM IST

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, युतीचा निर्णय लवकर घेण्याचा आग्रह!

मुंबई 30 जानेवारी : लोकसभा निवडणुका जशा जवळ येत आहेत तसं राजकीय हालचालींना वेग आलाय. युतीच्या प्रक्रियेला वेळ देण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना किंवा भाजपकडून मात्र याबाबत काहीही सांगितलं गेलं नाही. लवकरात लवकर युतीबाबतचा निर्णय घ्यावा अशी मागणी अमित शहा यांनी केली असल्याची माहितीही सूत्रांनी केली.


गेली अनेक महिने युती होणार की नाही याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. तर भाजपने शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्याला अजुनही प्रतिसाद दिलेला नाही. त्यापार्श्वभूमीवर अमित शहांनी केलेला फोन हा महत्त्वाचं पाऊल समजलं जातं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राज्यातल्या भाजपच्या खासदारांसोबत विभागवार बैठका घेतल्या. यात राज्यातल्या स्थितीवर चर्चा करण्यात आली. सर्व खासदारांनी आपलं मत मांडलं तर मुख्यमंत्र्यांनी आपलं आकलन सांगितलं. लोकसभा निवडणुकीआधी युती झाली नाही तर परिस्थिती जड जाईल अशी चिंता अनेक खासदारांनी व्यक्त केली अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Loading...


या बैठकीदरम्यान भाजप खासदार, आमदार तसंच पदाधिकाऱ्यांनी  चिंता व्यक्त केली 2014 सारखी परिस्थिती नसल्यानं युती न झाल्यास त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसू शकतो असा फिडबॅक मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. युतीसाठी राज्यात भाजप आग्रही आहे. तर शिवसेनेने आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवलाय. तर तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले अनेक उमेदवार निश्चितही केले आहेत.


पडद्यामागच्या हालचाली


लोकसभा निवडणुकींना आता फक्त चार महिने राहिले आहेत. महाराष्ट्रात युतीबाबात अजुन संभ्रम असतानाच आघाडीने आपले उमेदवारही फायनल केले आहेत. भाजप आणि सेनेचे नेते उघडपणे एकमेकांवर टीका करत असताना पडद्यामागून हातमिळविण्यासाठी हालचालीही सुरू आहेत.


नेत्यांची वक्तव्य आणि वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युतीची बोलणी करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.


प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेले जावडेकर यांना युतीची जडणघडण उत्तम प्रकारे माहित आहे. त्याचबरोबर जावडेकर यांचा स्वभाव हा शांत आणि संयमी असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याची शक्यता आहे.


भाजप आणि सेनेचे संबंध ताणल्याने युतीबाबात शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी आक्रस्ताळ्या नेत्याची नाही तर थंड डोक्याने विचार करणाऱ्या नेत्याची भाजपला गरज होती. त्यातून जावडेकरांचं नाव पुढे आल्याची चर्चा आहे. त्यामुळे युतीचा गाडा किती पुढे सरकतो हे येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. असं असतानाच सेना आणि भाजपच्या नेत्यांमधली टीका थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत.


शिवसेनाच मोठा भाऊ


शिवसेनेच्या खासदारांची बहुचर्चित बैठक सोमवारी मुंबईत झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना मार्गदर्शन केलं. खासदार संजय राऊत यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली. शिवसेनेच्या या बैठकीनंतरही युतीबाबत शिवसेनेने संदिग्ध भूमिकाच दिसून आली. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि यापुढेही राहिल असं संजय राऊत यांनी वारंवार सांगत शिवसेनेची भूमिका अजुनही नरमलेली नसल्याचेच संकेत दिलेत.


जवळ आलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि भाजपकडून वारंवार दिला जाणारा युतीचा प्रस्ताव यामुळे शिवसेनेच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून युतीबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही दिली जात होती. मात्र भाजपकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेना दिल्लीचं तख्त हलवेल असंही त्यांनी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांचा इशारा


युतीमध्ये आम्हीच मोठा भाऊ असा दावा करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. 'भाजप हा लाचार पक्ष नसून युतीसाठी याचना करणार नाही, हिंदुत्त्वासाठी एकत्र येणार असतील तर ते येतील. जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय लढणार', अशी गर्जनाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


जालन्यामध्ये सुरू असलेल्या कार्यकारिणीमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी हिंदु्त्वाच्या मुद्याला हात घालत युतीला इशारा दिला आहे.  गेल्या काही दिवसांपासून युतीबद्दल चर्चा सुरू आहे. भाजप नेत्यांनी युती होणारच असं ठासून सांगितलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती का व्हावी यावर आपलं स्पष्टीकरण देत सेनेसह विरोधकांनाही इशारा दिला आहे.


VIDEO : मूर्तीला हार घालताना गेला तोल; 15 फुट उंचीवरून पडल्याने पुजाऱ्याचा मृत्यू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...