धक्कादायक!, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या

धक्कादायक!, जमिनीच्या वादातून पती-पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या

वाढणाऱ्या जमिनीच्या किमती आणि त्यामुळे होणारे जमिनीचा वाद किती विकोपाला जाऊ शकतो हे नाऱ्हेण गावातील घटनेने समोर आले आहे

  • Share this:

अंबरनाथ, 26 एप्रिल : जमिनीच्या वादातून पती आणि पत्नीची टँकरखाली चिरडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यातील नाऱ्हेण गावात घडलाय. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

वाढणाऱ्या जमिनीच्या किमती आणि त्यामुळे होणारे जमिनीचा वाद किती विकोपाला जाऊ शकतो हे नाऱ्हेण गावातील घटनेने समोर आले आहे. नाऱ्हेण गावात राहणारे वासुदेव शेंद्रे आणि रेखा शेंद्रे या पती पत्नीला याच जमिनीच्या वादात आपला जीव गमवावा लागलाय.

बुधवारी संध्याकाळच्या सुरमारास वासुदेव आणि रेखा पती पत्नी आपल्या दुचाकीवरून एका हळदी समारंभाला निघाले होते. मात्र याच वेळी रस्त्यावर दबा धरून बसलेल्या एका पाण्याच्या टँकरने त्या दोघांना मागून येऊन चिरडले. यात वासुदेव आणि रेखा पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ज्या टँकरने या दोघांना चिरडले तो टँकर विलास पाटील याचा होता. विलास पाटील आणि शेंद्रे कुटुंबीय यांच्यात जमिनीवरून गेली काही दिवस वाद सुरू होता. जमिनीवरून पाटील आणि शेंद्रे कुटुंबामध्ये रोजच भांडणे सुरू होती. याच वादातून आपल्या काकांची हत्या केल्याचा आरोप मृत वासुदेवच्या पुतण्याने केलाय.

या प्रकरणी पोलिसांनी विलास पाटील, विनोद पाटील ,बाळाराम पाटील आणि टँकरचालक यांच्याविरोधात उल्हासनगच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. टँकर चालकास पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहे.

या घटनेने नाऱ्हेन गावात संतापाचे वातावरण आहे. मात्र केवळ जमिनीच्या वादातून आणि पैशाच्या हव्यासापोटी एक कुटुंब उद्वस्त झाले त्याची भरपाई कोण करणार हा प्रश्न उपास्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2018 08:03 PM IST

ताज्या बातम्या