नितीन आगे खून प्रकरणी सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका

नितीन आगे खून प्रकरणी सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका

२०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती.

  • Share this:

23 नोव्हेंबर : नितीन आगे खून प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका करण्यात आलीये. २०१४ मध्ये अहमदनगरच्या जामखेड येथील खर्डा गावातील नितीन आगे याची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिलाय. या प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने मुख्य आरोपी सचिन गोलेकर याच्यासह ९ आरोपींची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगेची हत्या करण्यात आली होती. गावातील वरच्या जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून नितीनची संपूर्ण गावासमक्ष निर्घृण हत्या करण्यात आली होती.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नितीन आगे हत्याप्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी संबंधित मुलीचा भाऊ आणि तीन अल्पवयीन मुलांसह ९ जणांना अटक केली होती. या सर्वांवर हत्या आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र सबळ पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 11:15 PM IST

ताज्या बातम्या