News18 Lokmat

गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी, संख्याबळ नसतानाही भाजपचाच महापौर

शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2018 12:59 PM IST

गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी, संख्याबळ नसतानाही भाजपचाच महापौर

अहमदनगर, 28 डिसेंबर : अहमदनगरमध्ये आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला धोबीपछाड केलं आहे. भाजपचे बाबासाहेब वाकळेच महापौर होणार आहेत.

शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी इतर सर्वपक्षीयांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यात राष्ट्रवादीच्या संपत बरस्कार यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही.

उत्तर महाराष्ट्रात भाजपाने जोरदार मुसंडी मारली. धुळे जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी महाजनांवर होती. भाजपने धुळ्यातली निवडणूक एकहाती जिंकली. मात्र, नगरमध्ये जबाबदारी नसल्यानं तिथे भाजप पिछाडीवर पडली होती.  अखेर पक्षानं गिरीश महाजन यांच्यावर महापौर निवडणुकीची  जबाबदारी दिली. त्यांनी ही जबाबदारी चोख पार पाडली आहे. महाजन यांची ही जोरदार राजकीय खेळी होती असंच म्हणावं लागेल.

अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीसाठी भाजपनं कर्नाटक पॅटर्न हाती घेतला होता. सर्वात कमी जागा असूनही भाजपनं महापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. "आपलाच महापौर होणार", असा दावाच भाजपनं केला होता.

10 डिसेंबर रोजी अहमदनगर महापालिका निवडणुकांची मतमोजणी झाली. 68 जागांपैकी शिवसेना-24, राष्ट्रवादी-18, भाजप-14 अशा जागांवर आहे. परंतु, 35 जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नव्हता. आज महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनंही उडी घेतल्यामुळे चुरस वाढली.

Loading...

भाजपकडून महापौरपदासाठी बाबासाहेब वाकळे यांनी अर्ज भरला आहे. तर शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीचे संपत बरस्कार यांनी अर्ज भरला होता. पण संपत बरस्कार यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.

कमी जागा असूनही भाजपनं महापौरपदावर दावा केला. आकड्याचं गणित जुळल्यामुळे भाजपनं महापौरपदाचा अर्ज भरला, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.

भाजपनं महापौरपदासह उपमहापौरपदासाठीही अर्ज भरला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून मालन ढोणे यांनी आपला अर्ज भरला आहे. तर शिवसेनेकडून गणेश कवडे आणि राष्ट्रवादीकडून रुपाली वारे यांनी अर्ज भरला आहे.

महापौरपदासाठी कोण कुणाला पाठिंबा देणार याबद्दल सस्पेन्स वाढला आहे. त्यामुळे घोडेबाजाराला जोर आला आहे. तर दुसरीकडे अनेक नगरसेवकांचा संपर्क होत नसल्याचं समोर आलं आहे.


विशेष म्हणजे, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही सत्तेचा पेच निर्माण झाला होता. भाजपकडे पूर्ण संख्याबळ नसतानाही बी.एस.येडीयुरप्पा यांनी सत्तेचा दावा केला होता. परंतु, संख्याबळ सिद्ध न करू शकल्यामुळे ऐनवेळी भाजपला माघार घ्यावी लागली होती. आता नगरमध्येही भाजपने कर्नाटकसारखीच खेळी केली असल्याची चर्चा रंगली आहे.


महापौरपदाच्या शर्यतीत कोण-कोण?


शिवसेना - बाळासाहेब बोराटे


भाजप - बाबा वाकळे


राष्ट्रवादी- संपत बारस्कर


उपमहापौरपदासाठी कुणी भरला अर्ज?


शिवसेना - गणेश कवडे


भाजप - मालन ढोणे


राष्ट्रवादी - रुपाली वारे


 VIDEO :..आणि अजित पवार डोंबिवलीला निघाले लोकलने!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...