काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर, जाणून घ्या कधी होणार जाहीर

काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर, जाणून घ्या कधी होणार जाहीर

उद्या शुक्रवारी काँग्रेसची दिल्लीत निवड छाननी समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा नावावर चर्चा होणार आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 07 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 15 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचाही समावेश आहे. परंतु, या 15 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा समावेश नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या शुक्रवारी महाराष्ट्रातील 26 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.

उद्या शुक्रवारी काँग्रेसची दिल्लीत निवड छाननी समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा नावावर चर्चा होणार आहे. अशीही चर्चा आहे की, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर ते थेट भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात मैदानात उतरली. नागपूरची जागा आपल्याला मिळावी अशी इच्छा पटोले यांनी व्यक्त केली होती.

संजय काकडेंना उमेदवारी?

तर दुसरीकडे पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेही काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आधीच काँग्रेसचे निष्ठावंत नेते मोहन जोशी, अभय छाजेड यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु, निष्ठावंतांना डावलून आयाराम उमेदवाराला उमेदवारी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे, संजय काकडेंनी उमेदवारीसाठी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या.तसंच पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आणि संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.


वादग्रस्त साक्षी महाराजांच्या विरोधात उभी राहणार ही 42 कोटींची मालकीण; सर्वांत मोठ्या मतदारसंघात चुरस

नगरची जागा काँग्रेसकडे?

काँग्रेस आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरू आहे. यातील अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रेसने ही जागा आपल्याकडे यावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या जागेच्या बदल्यात औरंगाबादची जागाही राष्ट्रवादीला देण्यात येईल. नगरमधून सुजय विखे पाटील हे काँग्रेसकडून निवडणूक लढवतील. काही दिवसांपूर्वीत शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला दिली असं विधान केलं होतं. परंतु, त्यानंतर लगेच पवारांनी यु-टर्न घेतला होता. मात्र, आता काँग्रेस नगरच्या जागेवर ठाम असून उद्या यावर निर्णय होऊ शकतो.

मुंबईतून 5 जागा

मागील आठवड्यात राहुल गांधी यांची मुंबईत सभा झाली होती. यावेळी मुंबईतील 5 जागांवर चर्चा झाली होती. मुंबईतून दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त आणि संजय निरुपम निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. परंतु, उत्तर मुंबईतून कोण निवडणूक लढवणार याबद्दल अजूनही सस्पेंन्स कायम आहे. आज होणाऱ्या या बैठकीत या जागांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.


सोनिया गांधींची राजकारणातून निवृत्ती नाही


आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या 15 उमेदवारांचे नाव घोषित केले आहे. या यादीत गुजरातमधील 4 तर उत्तर प्रदेशमधील 11 जागांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसच्या माजीअध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहे. तर राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात प्रशांत पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रशांत पटेल हे 1997 ला एमएस विद्यापीठाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांची बडोदामधून काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पटेल यांच्या कारकिर्दीतच स्थानिक पालिका निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी मात्र निराशाजनक होती. परंतु, पटेल हे पाटीदार समुहाचे नेते म्हणून ओळखले जातात. गुजरातमधील पाटीदार समुहांची लोकसंख्या पाहता पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही आहे काँग्रेसच्या 15 उमेदवारांची पहिली यादी

सोनिया गांधी - रायबरेली, उत्तर प्रदेश

राहुल गांधी - अमेठी, उत्तर प्रदेश

इम्रान मसूद - सहारनपुर, उत्तर प्रदेश

सलीम इकबाल शेरवानी - बदायूं, उत्तर प्रदेश

जितिन प्रसाद - धौरहरा, उत्तर प्रदेश

अन्नू टंडन - उन्नाव, उत्तर प्रदेश

सलमान खुर्शीद - फर्रुखाबाद, उत्तर प्रदेश

राजाराम पाल - अकबरपूर, उत्तर प्रदेश

ब्रिज लाल खबरी- जालौन, उत्तर प्रदेश

निर्मल खत्री - फैजाबाद, उत्तर प्रदेश

आर.पी. एन. सिंग - कुशी नगर, उत्तर प्रदेश

राजू परमार - पश्चिम अहमदाबाद, गुजरात

भारतसिंह सोलंकी - आनंद, गुजरात

प्रशांत पटेल - वडोदरा, गुजरात

रणजीत मोहनसिंग रतवा - छोटा उदयपूर, गुजरात

====================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 10:26 PM IST

ताज्या बातम्या