आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत

सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे विस्तारात काही वाद होण्याची शक्यता नाही आणि शिवसेनाही काही ताणून धरणार नाही.

News18 Lokmat | Updated On: May 28, 2019 09:07 PM IST

आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नाहीत

मुंबई 28 मे : मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल आणि आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा गेली काही दिवस सुरू आहे. मात्र शिवसेना उपमुख्यमंत्रीपद न घेण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

शिवसेना आदित्य ठाकरे यांच्यासाठी आग्रही आहे अशीही चर्चा होती मात्र अशा प्रकारची चर्चा पक्षात झाली नसल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. विधानसभा निवडणुकींना फक्त सहा महिने राहिले आहेत. त्यामुळे एवढ्या अल्पकाळासाठी आदित्य यांच्यासाठी शिवसेना आग्रही असेल अशी शक्यता नाही असं राजकीय निरिक्षकांचं मत आहे.

सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये उत्तम समन्वय आहे. त्यामुळे विस्तारात काही वाद होण्याची शक्यता नाही आणि शिवसेनाही काही ताणून धरणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्येही उत्तम समन्वय आहे त्यामुळे हा विस्तार सहजपणे पार पडेल अशी शक्यता आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात विस्तार?

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार शक्य असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा जोर पकडलाय. मंत्रिमंडळातल्या काही जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे असंतुष्टांना गाजर दाखविण्यासाठी अशी खेळी खेळण्यात येत असल्याचं बोललं जातंय. मात्र आता लोकसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर अधिवेशनापूर्वी हा विस्तार नक्की समजण्यात येतो.

Loading...

राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या 5 ते 10 जूनच्या दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काही मंत्रिपदं ही नव्या लोकांना दिली जाणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिमंडळात नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. या विस्तारात मंत्रिपद मिळालं तरी काम करण्यासाठी जेमतेम चार महिनेच मिळण्याची शक्यता आहे.

हा मंत्रिमंडळ विस्तार 23 मे रोजी लोकसभेच्या निर्णयावर अवलंबून होता. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागल्याने राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षिरसागर, विजयसिंह मोहिते पाटील या काँग्रेस-राष्ट्रवादीतील बंडखोर नेत्यांना मोठी खाती देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.

विखे पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश?

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 30 मे रोजी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि काही मंत्र्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी घडू शकतात. यातील सर्वात महत्त्वाची घडामोड असेल ती काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करु शकतील. विखे-पाटील यांच्यासोबत काही आमदार देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्थात त्यांच्यासोबत कोणते आमदार भाजपमध्ये जाणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 28, 2019 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...