परभणी, 9 जून- दहावीच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे परभणी जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. सुरेखा जाधव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
दहावीचा निकाल काल (8 जून) ऑनलाईन जाहीर झाला. सुरेखाने निकाल पाहिला. तिला परीक्षेत अपयश आले होते. नापास झाल्यामुळे ती मनातून पूर्णपणे खचली होती. नैराश्यातून सुरेखाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
नापास होण्याच्या भीतीने त्याने केली आत्महत्या, मात्र दहावीत झाला उत्तीर्ण!
दहावीच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने निकाल जाहीर होण्याच्या दाेन दिवस आधी कोल्हापूर शहरातीस आर. के नगरात एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र शनिवारी जाहीर झालेल्या निकालात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. प्रणव सुनील जरग असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.
'मी इंग्रजी विषयात नापास होणार,'असे तो आई-वडिलांना सांगत होता. 'नापास झालास तरी चालेल काही हरकत नाही पुन्हा प्रयत्न कर,' असा आई-वडील त्याला धीर देत होते. परंतु तो नैराश्यामुळे पूर्णपणे खचला होता. या गुरुवारी (ता.6) सायंकाळी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, प्रत्यक्षात आज (ता.8) शनिवारी महाराष्ट्र बोर्डाचा दहावीची निकाल जाहीर झाला. त्यात प्रणव 42 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला आहे. प्रणवच्या मित्रांनी तो दहावीत उत्तीर्ण झाल्याचे त्याच्या आई-वडिलांना सांगितले. मात्र, त्यांचा आनंद कधीच हरपला होता.
प्रणव हा देशभक्त रत्नाप्पा कुंभार विद्यालयाचा विद्यार्थी होता. दहावीचे पेपर अवघड गेल्याने त्याला नापास होण्याची भीती मागील काही दिवसांपासून सतावत होती. या नैराश्येतून प्रणवने गुरुवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.
प्रणव जीवनाच्या परीक्षेत झाला Fail
प्रणव दहावीच्या परीक्षेत पास झाला मात्र तो जीवनाच्या परीक्षेत फेल झाल्याची भावना त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रणवचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. जरग कुटुंबीय मूळचे करवीर तालुक्यातील महे येथील आहेत. 1985 पासून ते कुटुंब आर.के.नगरात राहत आहेत.
VIDEO: खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा