21 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना युतीमध्ये प्रचाराऐवजी जागावाटपावर घासाघीस सुरू असणं हे दुदैर्व असल्याची खंत व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला 119 जागांचा अंतिम प्रस्ताव दिला आहे. युती टिकवण्यासाठी हा आमचा शेवटचा प्रयत्न आहे. या पलिकडे ताणून धरल्यास आमचा नाईलाज होईल, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात शिवसेना पदाधिकार्यांच्या मेळाव्यत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला शेवटचा आणि अंतिम प्रस्ताव दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले युतीत आम्ही मित्रपक्ष भाजपला शेवटचा पर्याय देत 119 जागा द्यायला तयार असून, शिवसेनेला 151 आणि मित्रपक्षांना प्रत्येकी 9 जागा म्हणजे एकूण 18 जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. 'महिनाभरानंतर राज्यात भगवी दिवाळी साजरी केली जाईल' असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यात सत्ता शिवसेनेचीच असा इशारा भाजपला दिला आहे. भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असतानाही युतीमध्ये वाद व्हायचा. पण त्यावेळी कुणीच ऐवढे ताणून धरले नाही. सत्तेसाठी युती झाली नसून हिंदूत्वाच्या मुद्द्यावर युती झाली. युतीसाठी सुरवातीला ओम माथूर, देवेंद्र फडणवीस माझ्याकडे 135-135 असा फॉर्म्युला घेऊन आले होते. तेव्हा मी तो प्रस्ताव फेटाळून लावत त्यांना स्पष्ट सांगितले, की आम्ही तुम्हाला एवढ्या जागा देवू शकत नाही. तुम्ही देशात राज्य करा, पण राज्यात आम्हाला त्रास देऊ नका, असं ही ते म्हणालेत.
शिवसेनेच्या नेत्यांनी युतीविषयी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ओळखूनच निर्णय घेऊ, असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. आपल्या पक्षात अनेक उमेदवार इच्छुक आहेत. हेच कार्यकर्ते शिवसेनेचं वैभव आहेत. मला सत्ता पाहिजे आणि मी ती मिळवणारच. मला महाराष्ट्राला काहीतरी द्यायचे आहेत, त्यासाठी सत्ता हवी आहे. उमेदवारांची यादी तयार आहे, ती कोणत्याही क्षणी जाहीर करण्यास तयार आहे. शिवसेनाप्रमुखांचे प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करणार आहे. पुढील महिन्यात यावेळी महाराष्ट्रात भगवी दिवाळी साजरी करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. आमच्या हिश्शाचं कुणी हिसकावून घेऊ शकणार नाही. युती राहो अथवा तुटो मी लढायला तयार आहे. ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही आयुष्यातली शेवटची परिक्षा असल्यासारखं लढू आणि जे होईल ते विधीलिखित असेल, असं म्हणत युती टिकवण्याचा मी शेवटचा प्रयत्न करतोय. यावरून मी वातावरण बिघडू देणार नाही, असंही ते म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमात उपस्थित पदाधिकार्यांनीही उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी घोषणाबाजीही केली. याप्रसंगी 'विकासाच इंद्रधनुष्य' ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Shivsena, Udhav thakare, उद्धव ठाकरे, जागावाटप, भाजप, महायुती, महायुतीची बैठक, शिवसेना