ZP Election Result Live: नागपुरात 'गड' राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत

ZP Election Result Live: नागपुरात 'गड' राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत

सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

  • Share this:

मुंबई,8 जानेवारी: नागपूरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला आज (बुधवार) 10 वाजता सुरुवात झाली आहे. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Live Update...

> वाशिम- जिल्हा परिषदेचा पहिला निकाल जाहीर... काटा गटात शिवसेनेचे विजय खानझोडे विजयी

> धुळे- आर्वी गटातून राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील 1 हजार मतांनी मागे

> वसईत जिल्हापरिषद, पंचायतसमिती च्या मतमोजणीला सुरवात

> धुळे- शिरपूर : भाजपची विजयी सुरवात फत्तेपुर गणातून सत्तारसिंग पावरा विजयी

> धुळे- कोडीद गणातून अपक्ष सुशीला कांतीलाल पावरा विजयी, भाजप उमेदवार पराभूत

>पालघरमध्ये तिरंगी लढत..

पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे 'महाआघाडी' करुन लढत आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार रिंगणात आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशीब आजमावत आहेत.

> नागपुरात गड राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक ही भाजपसाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले.

दरम्यान, नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.

> नंदुरबारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व

2013 मध्ये काँग्रेसचा वरचष्मा राहिला, मात्र 2008 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत नंदुरबार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. त्यामुळे भाजपला नंदुरबार जिल्हा परिषद खेचून आणण्यासाठी दमछाक करावी लागणार आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 359 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.

> वाशिममध्ये बहुरंगी लढत

वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी 263 उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या 104 जागांसाठी 461 उमेदवार मैदानात आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही तिन्ही पक्षांनी एकत्र यावं, अशी तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांची इच्छा होती.

> अकोल्यात या दोन दिग्गजांची कसोटी

अकोला जिल्हा परिषदेसाठी 277 तर पंचायत समितीसाठी 492 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेवर भारिप म्हणजे आताच्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. या वेळेस थोडंसं वेगळं चित्र दिसत आहे. कारण या वेळेस महाविकास आघाडी झाल्याने आणि भाजपचे चार, तर शिवसेनेचा एक आमदार निवडून आल्याने चित्र थोडं वेगळं दिसून येत आहे. संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपापले उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उभे केले आहेत. त्यामुळे या दोघा दिग्गजांची कसोटी पाहायला मिळणार आहे….!

> धुळ्यात अनिल गोटे विरुद्ध भाजप

धुळे जिल्हा परिषद निवडणूक भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल यांच्यासह नुकतेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यामुळे, तसेच धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जबाबदारी गोटेंच्या खांद्यावर सोपवल्यामुळे या निवडणुकीत गोटे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री असाच सामना पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: January 8, 2020, 10:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading