भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातून, जयंत पाटलांचा घणाघात

भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातून, जयंत पाटलांचा घणाघात

भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी :  भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या होमग्राऊंड अर्थात नागपूरमध्ये महाविकासआघाडीने भाजपचा धुव्वा उडवला आहे. भाजपाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उद्ध्वस्त झाली असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.

नागपूर जिल्हा परिषदेचा आज निकाल लागला असून महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. त्यानंतर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. मात्र, आज निवडणूक झाली असून ज्या  जिल्ह्यात भाजपचे दिग्गज नेते आहेत. त्याच जिल्ह्यात भाजपला पराभव पत्करावा लागला असल्याचंही जयंत पाटील म्हणाले.

नागपुरकरांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर नाराजी व्यक्त केली असून याची दखल महाराष्ट्र घेईल, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. भाजकडून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं आहे.

नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे.  पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली होती.

नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा- 58

काँग्रेस-26

राष्ट्रवादी – 12

भाजप -10

शिवसेना -01

अपक्ष– 01

शेकाप- 01

भाजपचा धुव्वा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागरपुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी निवडणुका लढत होते. त्यासाठी महाविकास आघाडीने तीन मंत्र्यांना हा भार सोपवला होता. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या 58 सर्कलसाठी 270 तर पंचायत समितीच्या 116 गणासाठी 497 उमेदवार रिंगणात होते. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nagpur
First Published: Jan 8, 2020 05:15 PM IST

ताज्या बातम्या