प्रवीण मुधोळकर (प्रतिनिधी),
नागपूर, 6 जुलै- ऑनलाईन फुड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून अनेकदा अक्षम्य चुका होत असल्याच निदर्शनात आले आहे. पण अशा तक्रारींवर डिलिव्हरी बाँईजना रागावण्यापलीकडे ग्राहक काही करत नाहीत. पण, अशातच एका प्रकरणात उपवास सोडण्यासाठी पनीर बटर मसाला ऑर्डर केलेल्या एका ग्राहकाला दोनदा बटर चिकन डिलिव्हरी केल्याबद्दल झोमॅटो आणि हॉटेलला 55 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
षण्मुख देशमुख हे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकील आहेत. ते गेल्यावर्षी 31 मे रोजी काही कामानिमित्त पुण्यात गेले होते. उपवास असल्याने त्यांनी झोमेटॉमार्फत प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमधून पनीर बटर मसाला मागवलं. पण जेवणाचे पार्सल उघडल्यावर ते पनीर नसून चिकन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा सर्व प्रकार बघितल्यावर देशमुख यांनी तातडीने फोन करुन पार्सल देणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला बोलवलं आणि त्याबाबतची माहिती दिली. दरम्यान पुन्हा ऑर्डरमध्ये चिकनच आल्याने अॅड देशमुख यांनी झोमँटोला तक्रार केली. झोमँटोने देशमुख यांची माफी मागितली पण देशमुख हे ग्राहक न्यायालयात गेले.
या प्रकरणी ग्राहक मंचाकडून झोमॅटो आणि पुण्यातील प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलवर कारवाई करत नुकसान भरपाई म्हणून 50 हजार आणि मानसिक त्रासाबद्दल 5 हजार असा एकूण 55 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा दंड 45 दिवसांच्या आत देण्यात यावा, असे आदेश दिले आहे. तसेच याप्रकरणी विलंब केल्यास त्यावर 10 टक्के व्याज आकारण्यात येईल, असेही या आदेशात सांगण्यात आले आहे.
काय म्हणाले, षण्मुख देशमुख (लढा देणारे वकील)
'माझा उपवास असल्याने मी पुण्यात झोमँटोवर ऑर्डर केली. पण उपवासाच्या दिवशी मला मांसाहारी जेवण आले. या प्रकरणी पुण्यातील ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे झोमॅटो आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी नुकसान भरपाई म्हणून 5 लाख आणि मानसिक त्रासाबद्दल 1 लाख रुपयांची मागणी केली. मी हा लढा लढला आणि 55 हजार नुकसान भरपाई मिळाली.'
दरम्यान, ऑनलाईन फुड मागविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सोबतच तक्रारीही. पण अशा तक्रारींवर गंभीरतेने घेत दोषींवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तेव्हाच असे प्रकार थांबू शकतील.
सापाला पाहून जेव्हा पोलिसाची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO