मुंबई, 20 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला चंद्रपूरमध्ये शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला. शिवसैनिकांनी केलेल्या या कृत्याचं भाजपचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मनापासून स्वागत केलं.
संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकून शिवसैनिकांची पाठ थोपटली. "विमानातून बाहेर आलो आणि मोबाईलमध्ये शिवभक्तांनी छत्रपती घराण्याची बदनामी करणाऱ्या इसमाला चोप दिलेले व्हिडीओ पाहायला मिळाले. माझ्या सुद्धा मनातली इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान वाटले. अश्या प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त जागीच केला तर दुसरा कुणी धाडस करणार नाही."
तसंच, "कायदा मानणारा, कायद्याचे पालन करणारा, शिवरायांचा वंशज आहे. पण ह्या प्रकरणात माझा सुद्धा संयम सुटला होता. मी त्या सर्व शिवभक्तांच्या पाठीमागे ठाम उभा आहे ज्यांनी कामगिरी केली. माझ्यासारखे कोट्यवधी शिवभक्त तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. ही मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन!" असंही संभाजीराजे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सतत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या जितेंद्र राऊत नावाच्या या इसमाला चंद्रपूरकर शिवसैनिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या पेंढरी- कोकेवाडा येथे राहणारा हा इसम गेले काही दिवस सातत्याने महाराजांविषयी आक्षेपार्ह आणि निंदाजनक पोस्ट करत होता.
त्याने संभाजी महाराजांबद्दल ही अशाच पद्धतीने फेसबुक पोस्ट केल्या होत्या. स्थानिक शिवसैनिक आणि पोलिसांनी यासंदर्भात त्याला पोलीस ठाण्यात बोलावून समजही दिली होती आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे पोलिसांना रीतसर निवेदन दिले होते.
शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी दिला बेदम चोप, चंद्रपूरमध्ये घडली घटना pic.twitter.com/jcv2Z4jGmY
— sachin salve (@SachinSalve7) March 20, 2020
मात्र, यानंतरही या पोस्ट सुरूच राहिल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी पेंढरी-कोकेवाडा या गावात पोचून त्याची बेदम धुलाई केली. या इसमाचा तोंडाला काळे फासले. त्याची सिंदेवाही तालुकास्थानी धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केले गेले.
दरम्यान, या व्यक्तीकडून महाराजांविषयी माफी देखील मागून घेण्यात आली. जितेंद्र राऊतच्या विरोधात शिवसैनिकांनी सिंदेवाही येथे रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात गुन्हे नोंदविण्याची कारवाई सुरू असून सिंदेवाही शहरात झालेल्या धिंड काढण्याच्या प्रकाराने मोठा जमाव एकत्र झाला होता. या व्यक्तीने सातत्याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकत होता. त्याला समजही देण्यात आला होता, पण त्याने ऐकले नाही, त्यामुळे शिवसेनेनं आपल्या पद्धतीने समज दिल्याचं जिल्हा प्रमुखांनी सांगितलं.