माकडांना बिस्कीट देण्यासाठी घाटात थांबला, तोल जाऊन 200 फूट दरीत कोसळला

माकडांना बिस्कीट देण्यासाठी घाटात थांबला, तोल जाऊन 200 फूट दरीत कोसळला

चिपळूण कराड मार्गावरील कुंभार्ली घाट हा वाहतुकीस खूप अवघड आहे. घनदाट जंगल आणि प्रचंड उंचीमुळे या मार्गावरून प्रवास करताना अनेकांची भंबेरी उडते.

  • Share this:

 स्वप्नील घाग, प्रतिनिधी

चिपळूण, 26 डिसेंबर : कुंभार्ली घाटातील माकडांना बिस्कीट खाऊ घालण्यासाठी गेलेल्या युवकाचा तोल जाऊन 200 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे मृत्य झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.   पाटण येथून चिपळूणमध्ये कामनिमित्ताने आलेल्या सुरेश विभुते या युवकाचा तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जवळपास दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक तरुणांना सुरेशचा मृतदेह शोधण्यास यश आलं.

चिपळूण कराड मार्गावरील कुंभार्ली घाट हा वाहतुकीस खूप अवघड आहे. घनदाट जंगल आणि प्रचंड उंचीमुळे या मार्गावरून प्रवास करताना अनेकांची भंबेरी उडते. या मार्गावर अनेक ठिकाणी माकडांची टोळी पाहायला मिळते. त्यामुळे अनेक प्राणीमित्र याठिकाणी थांबून इथल्या माकडांना शक्य ते खायला देऊन पुढच्या प्रवासाला निघून जातात.

मृत सुरेश विभुते हा भाजी विक्रेता होता. कोकणात अनेक बाजारात तो भाजी विकण्यासाठी आठवडा बाजार करत होता. आज चिपळूणमध्ये कामानिमित्त कारने आला होता.

सुरेश हा चिपळूण मधून परतत असताना कुंभार्ली घाटातील माकडांना बिस्किट्स खाऊ घालण्यासाठी थांबला होता. एका माकडाला बिस्किट देताना अचानक सुरेशचा तोल गेला आणि तो थेट 200 फूट खोल दरीत कोसळला. यावेळी सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी खूप आरडाओरडा करत त्याला वाचवण्यासाठी मदत मागितली परंतु, दरी अत्यंत खोल असल्यामुळे त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना यश आले नाही.

दरम्यान, शेजारी असलेल्या फोफळी, शिरगाव या भागातल्या स्थानिक तरुणांनी पोलिसांच्या मदतीने सुरेश चा शोध घ्यायला सुरूवात केली. मात्र, सुमारे दोन तासांच्या शोधकार्यानंतर सुरेशचा मृतदेह शोधण्यास यश आलं.  शिरगाव पोलिसांनी सुरेशचा मृतदेह कामथे येथील शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 10:50 PM IST

ताज्या बातम्या