भुसावळ, 29 डिसेंबर: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका हत्याकांडाच्या (Murder Case, Raver, jalgaon) घटनेनंतर पुन्हा एकदा हादरला आहे. रावेर तालुक्यातील सुनोदा (Sunoda) गावात अनैतिक संबंधातून एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (murder) करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येचा उलगडा होवू नये यासाठी मारेकऱ्यांनी तरुणाचा मृतदेह जळगाव जवळील नशिराबाद हद्दीतील रेल्वे रुळावर फेकला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या काही तासांत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींनी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आणून टाकल्याचं पोलीस तपासाअंती स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा...लग्नासाठी वडिलांना आणखी कर्ज घ्यावं लागेल म्हणून उच्चशिक्षित मुलीनं उचललं....
नेमकं काय आहे प्रकरण...
रावेर तालुक्यातील सुनोदा येथील रहिवासी असलेला दीपक सपकाळे (वय-24) याची अनैतिक संबंधातून हत्या केल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मारेकऱ्यांनी दीपकची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. दीपकचा मृतदेह नशिराबादजवळील रेल्वे रुळावर सापडला होता.
या प्रकरणी पोलिसांनी बारकाईनं तपास करून अवघ्या काही तासांत एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतलं आहे.
विवाहितेशी होते संबंध
रावेर तालुक्यातील सुनोदा गावातील दीपक सपकाळे या तरुणाची घराशेजारीच राहणाऱ्या 21 वर्षीय विवाहितेशी अनैतिक संबंध होते. याची कुणकुण तिच्या पतीसह नातेवाईकांना लागली होती. त्यात विवाहितेनं दीपक सपकाळे याला तिच्या माहेरी यावल तालुक्यातील पाडळसा येथे शनिवारी (26 डिसेंबर) रोजी रात्री बोलवलं होतं.
हेही वाचा...ग्रामपंचायत निवडणूक: सरकारचा मोठा निर्णय, जात पडताळणी अर्जासाठी मुदतवाढ
त्यानंतर 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी व अन्य एक विधिसंघर्ष बालकाच्या मदतीनं दीपक सपकाळेची हत्या करण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह चारचाकी वाहनातून नशिराबादजवळील जळगाव खुर्द रेल्वे रुळावर आणून टाकण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.