स्कुटीवर 180 किमी प्रवास करून कर्तव्यावर परतली देशाची लेक, नक्षलींच्या भीतीनेही नाही डगमगली

स्कुटीवर 180 किमी प्रवास करून कर्तव्यावर परतली देशाची लेक, नक्षलींच्या भीतीनेही नाही डगमगली

Inspiration Story: प्रवासाची सोय होत नव्हती, तर या डॉक्टर तरुणीने थेट स्कुटीवर 180 किमीचा प्रवास करत बालाघाटहून नागपूर गाठलं. अगदी रस्त्यात नक्षलींचा परिसर असतानाही ती घाबरली नाही.

  • Share this:

नागपूर, 22 एप्रिल : कोरोनाच्या भीतीनं सख्खे नातेवाईक दुरावल्याचं चित्र देशात पाहायला मिळत आहे. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, सेवक मात्र जिवाची बाजी लावून या परिस्थितीत काम करत आहेत.  देशाच्या एका लेकीनं तिच्यावर अवघ्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे. सुटीसाठी घरी गेलेल्या या डॉक्टर तरुणीला कोरोनाचं संकट वाढल्यानं कर्तव्यावर परतावं लागलं. पण प्रवासाची सोय होत नव्हती तर तिनं थेय स्कुटीवरून कामाचं ठिकाण गाठलं. 180 किमीचा प्रवास करत ती बालाघाटहून नागपूरला (Young doctor travelled 180 km on scooty) परतली. अगदी रस्त्यात नक्षलींचा (Naxlite) परिसर असतानाही ती घाबरली नाही.

(वाचा-1 मेपासून 18 सर्वांना कोरोना लस, शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात)

डॉक्टर प्रज्ञा घरडे असं या तरुणीचं नाव आहे. पेशाने डॉक्टर असलेली प्रज्ञा या नागपूरच्या एका खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये देखील सेवा देते. मधल्या काळात काहीशी स्थिती सामान्य होऊ लागल्यानं प्रज्ञा या मध्य प्रदेशात बालाघाट इथं त्यांच्या घरी सुटीसाठी गेली होती.  पण त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आणि पुन्हा डॉक्टरांना बोलवण्यात आलं. त्यामुळं प्रज्ञाला पुन्हा कर्तव्यावर परतायचं होतं. पण लॉकडाऊनमुळं महाराष्ट्रात येणाऱ्या बस किंवा रेल्वेमध्ये जागा मिळत नव्हती. अशा वेळी कर्तव्यावर कसं परतायचं हा मोठा प्रश्न प्रज्ञाच्या समोर होता.

(वाचा-मुंबईचा 'ऑक्सिजन मॅन'! गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी विकली महागडी SUV कार)

अडचण मोठी होती तरीही प्रज्ञानं हार न मानता त्यावर पर्याय शोधला. अखरे प्रज्ञानं बालाघाट ते नागपूरचा 180 किमीचा प्रवास स्कुटीवर करण्याचा निर्णय घेतला. येताना संपूर्ण जंगलाचा मार्ग, रस्त्यात लागणारा नक्षलींचा प्रभाव असलेला परिसर अशी भीती होतीच. कुटुंबीय नातेवाईकांची तिला पाठवण्याचि हिम्मत होईना. पण ही भीती प्रज्ञाचा निश्चय हलवू शकली नाही. प्रज्ञानं तयारी केली आणि स्कुटीवर तिचं सामान घेऊन प्रवास सुरू केला. त्यानंतर सलग 7 तासांचा प्रवास करत प्रज्ञा अखेर 180 किमीवर असलेल्या नागपूरमध्ये पोहोचली. आता ती कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू झाली आहे.

रस्त्यात काहीही मिळालं नाही

प्रज्ञा यांनी सांगितलं की कोरोना आणि लॉकडाऊन अशा परिस्थितीमुळं त्यांना 7 तासांच्या या प्रवासामध्ये रस्त्यात कुठंही खायला किंवा प्यायला काही मिळालं नाही. तसंच उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि प्रज्ञाकडे सामानही जास्त होतं, त्यामुळं तिला काही अडचणींचा सामना करावा लागला. पण कर्तव्यावर परतल्याचं समाधान अधिक असल्याचं प्रज्ञानं म्हटलं.

रोज 12 तास सेवा

प्रत्रा नागपूरमध्ये रोज एका कोविड रुग्णालयात 6 तास सेवा देते. याठिकाणी ती आरएमओ पदावर आहे. त्याशिवाय रोज सायंकाळी ती पालीमध्ये एका रुग्णालयातही रुग्णांवर उपचार करते. त्यामुळं तिला रोज 12 तासांपेक्षा जास्तवेळ पीपीई किट परिधान करून काम करावं लागतं.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 3:13 PM IST

ताज्या बातम्या