यवतमाळ, 26 डिसेंबर : यवतमाळ येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. मोहम्मद वसीम असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच नाव आहे.
मोहम्मद वसीम हे जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालात रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. काल सुटीच्या दिवशी ते महाविद्यालायत आले होते. त्यांनी आपले नियमित काम सुद्धा केले. मात्र दुपारी वैयक्तिक काम आल्यामुळे ते दुपारच्या सत्रात महाविद्यालयात येऊ शकले नाहीत. त्याबाबत त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला तशी माहिती दिली. तरी सुद्धा प्राचार्यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली, असा आरोप आहे. त्यामुळे वैतागलेल्या प्राध्यापक वसीम यांनी आज महाविद्यालयाच्या एका वर्ग खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
गळफास घेत असताना सदर प्राध्यापकाने त्याचा व्हिडिओ काढून महाविद्यालयाच्या ग्रुपवरही टाकला. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांमध्ये खळबळ उडाली. महाविद्यालयात उपस्थित असलेल्यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली आणि प्रा. मोहम्मद वसीम यांना खाली उतरवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सचिव हे मानसिक त्रास देत होते, त्यामुळेच आत्महत्येचा प्रयत्न केला, असा आरोप प्रा. वसीम यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती प्राध्यापक वसीम यांच्या नातेवाईकांना मिळताच ते देखील महाविद्यालयात पोहोचले. आता या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून नेमकी कोणावर कारवाई होते, हे पाहावं लागेल.