यवतमाळमध्ये भाजपला धक्का, महाविकास आघाडीला यश, अध्यक्ष शिवसेनाचाच

यवतमाळमध्ये भाजपला धक्का, महाविकास आघाडीला यश, अध्यक्ष शिवसेनाचाच

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे महाविकास आघाडीने पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे.

  • Share this:

भास्कर मेहरे,(प्रतिनिधी)

यवतमाळ, 13 जानेवारी: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे महाविकास आघाडीने पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, अद्याप औपचारिक घोषणा होण बाकी आहे. संख्याबळ जुळत नसल्याने भाजपने अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

सर्वसाधारण महिला प्रवर्गसाठी अध्यक्ष पद राखीव आहे. महाविकास आघाडीचे 43 विरुद्ध भाजप 18 अशी चुरस दिसून आली. यात शिवसेनेने अध्यक्षपदासह दोन सभापती पद मागितले. राष्ट्रवादीने एकच उपाध्यक्ष पद मागितले.

कॉग्रेसने बांधकाम आणि महिला बालकल्याण हे दोन पद मागितले. महाविकास आघाडीची सत्ता बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय राठोड, कॉग्रेस नेते माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, राष्ट्रवादी चे मनोहर नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपकडून महाविकास आघाडीमधील नाराज सदस्यांना हेरण्याचे प्रयत्न केला जात आहे.

पक्षीय बलाबल..

-शिवसेना: 20

-भाजप: 18

-कॉग्रेस: 12

-राष्ट्रवादी: 11

-एकूण -61 

मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला

दरम्यान, मुंबई आणि नाशिकमध्ये रिक्त झालेल्या नगरसेवकपदाच्या जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला आहे. मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 141 मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेनं जागा राखली आहे. या प्रभागातून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत.

मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांना 4427 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार दिनेश पांचाळ यांना 3042 मते मिळाली. त्यामुळे विठ्ठल लोकरे यांचा 1385 मतांनी विजय झाला आहे. मुंबई महापालिकेच्या मानखुर्द वार्ड क्रमांक 141 मध्ये विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी 9 जानेवारी रोजी मतदान झालं. तर 10 जानेवारी या निवडणुकीचा निकाल लागला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती. 25 पैकी 7 उमेदवारांनी माघार घेतल्याने 18 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. त्यामध्येही शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे काजी अल्ताफ महंमद, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमाम ऊद्दिन आणि समाजवादीचे खान जमिर भोले या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली.

नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 26 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले आहेत. इथं महाविकास आघाडी प्रयोग यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शिवसेनेनं जागा राखली आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. जाधव यांच्याविरोधात सेनेतून मनसेत गेलेले उमेदवार दिलीप दातीर हे उभे होते.

मनसेचे उमेदवार दिलीप दातीर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तर या प्रभागात भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. खान्देशी मतं ठरली निर्णायक ठरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या पोटनिवडणुकीत निच्चांकी मतदान झालं होतं.

First Published: Jan 13, 2020 02:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading