यवतमाळ, 25 एप्रिल: यवतमाळ जिल्ह्यात एका कोविड केअर केंद्रातून 20 कोरोना रुग्ण पळून गेल्याची घटना घडली आहे. स्थानिक आरोग्य अधिकारी डॉ. संजय पुरम यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटंजी तालुक्यातील वसतिगृहात बांधलेल्या कोविड-19 केअर सेंटरमध्ये शनिवारी ही घडना घडली. आरोग्य अधिकाऱ्यांद्वारा दिलेल्या तक्रारीनुसार घाटंजी पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत 20 रुग्णांवर एफआयआर दाखल केला आहे.
डॉ. संजय पुरम यांनी सांगितलं की, गावात शुक्रवारी कोविड-19 चौकशी शिबिर घेण्यात आलं होतं. त्यानंतर गावातील 19 लोक कोरोनाबाधित आढळले. त्यांना घाटंजीमधील एका कोविड केअर केंद्रात भरती करण्यात आलं. परंतु शनिवारी सकाळी जवळपास आठच्या सुमारास हे सर्व 19 रुग्ण आणि आणखी एक रुग्ण कोविड केअर केंद्रातून फरार झाले.
यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जर लोकांची अशीच वृत्ती कायम राहिली, तर जिल्ह्यात संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल, असंही ते म्हणाले. कोविड केअर केंद्रातून फरार झालेल्या रुग्णांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. देशातील कोरोना रुग्ण संख्येने आतापर्यंतचा मोठा उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठी कोरोना रुग्ण संख्या आहे. राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील आहेत. कोरोनाची ही वाढती आकडेवारी देशाची, राज्याची चिंता वाढवणारी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid-19, Maharashtra, Yavatmal