नागपूर : कवी आणि विचारवंत यशवंत मनोहर (Yashwant Manohar) यांनी त्यांना देऊ केलेला जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार वितरण समारंभात सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याऐवजी सावित्रीबाई फुले, फातिमा शेख किंवा ताराबाई शिंदे यांची प्रतिमा ठेवावी, अशी मागणी त्यांनी विदर्भ साहित्य संघाकडे केली होती, पण विदर्भ साहित्य संघाने या मागणीवर काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या 98व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना जीवनव्रती पुरस्कार दिला जाणार होता. मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या साहित्यिकांना कै.ग.त्र्यं.माडखोलकर यांच्या नावाने जीवनव्रती पुरस्कार दिला जातो. यावेळी हा पुरस्कार आंबेडकरवादी साहित्यिक यशवंत मनोहर यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. 14 जानेवारीला विदर्भ साहित्य संघाच्या 98व्या वर्धापन दिनाला त्यांना हा पुरस्कारही देण्यात येणार होता. पण त्यांनी व्यासपीठावर सरवस्तीची प्रतिमा ठेवण्यावर आक्षेप घेतला, तसंच आपण हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
'आपण आयुष्यभर स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणावर बंदी घालणाऱ्या शोषणसत्ताकाची प्रतीकं नाकारली, मग आता या प्रतिकांची प्रतिष्ठा मी का वाढवू?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबतचं पत्र त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवलं.
'इंग्रज यायच्याआधी भारतात सरस्वतीलाच पूजलं जात होतं, पण मग तरीही देशातील स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र का अज्ञानी राहिले? माझा सरस्वतीशी काय संबंध? कार्यक्रम साहित्याशी संबंधित आहे, मग त्यात कुसुमाग्रज, मुक्तीबोध किंवा इंदिरा संत यांची प्रतिमा ठेवायला हवी. मी माझं मत विदर्भ साहित्य संघाला कळवलं, पण त्यांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, त्यामुळे मी हा पुरस्कार नाकारला,' असं यशवंत मनोहर लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.
विदर्भ साहित्य संघाशी प्रतिक्रिया
दरम्यान विदर्भ साहित्य संघानेही याबाबत प्रतिक्रिया दिल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला, त्या सभागृहाचं नाव रंगशारदा आहे. सरस्वती आमच्या श्रद्धेचं प्रतिक आहे, त्यामुळे सरस्वती प्रतिमा हटवण्याचा प्रश्नच नाही. यशवंत मनोहर यांच्या मताचा आदर करतो. हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी तो स्वीकारायचं मान्य केलं, पण नंतर मात्र वैयक्तिक कारण असल्याचं सांगत येऊ शकत नसल्याचं त्यांनी कळवलं, असं विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.