Home /News /maharashtra /

मूकबधीर महिलेला घरचा पत्ताही सांगता येईना, मग पालकमंत्र्यांनी असा लावला शोध

मूकबधीर महिलेला घरचा पत्ताही सांगता येईना, मग पालकमंत्र्यांनी असा लावला शोध

सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला वलगाव येथे आढळली होती. एका ट्रकमधून ती वलगाव येथे उतरली. ती रस्त्याने जात असताना पोलिसांना आढळली.

अमरावती, 03 जून : मूकबधीर असल्यामुळे पत्ता न सांगता येणाऱ्या एका महिलेमुळे जिल्हा रूग्णालयात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. अखेर,  राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हा रूग्णालयात धाव घेतली.  आधार कार्ड प्रणालीच्या साह्याने या महिलेचा मूळ पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले असून, या महिलेला स्वतंत्र वाहनाने स्वगृही पोहोचण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. के. मंजुळा असं या महिलेचं नाव असून ती आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील मंदिगिरी (अडोणी) येथील रहिवाशी आहेत.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी साडीचोळी देऊन या महिलेला निरोप दिला.  घरी परतण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. पालकमंत्र्यांसह सगळेच यावेळी भारावून गेले होते. हेही वाचा- या राज्याने केला रेकॉर्ड; कोरोनाला रोखण्यासाठी तब्बल 4.85 कोटी नागरिकांची तपासणी सुमारे दीड महिन्यापूर्वी ही महिला वलगाव येथे आढळली होती. एका ट्रकमधून ती वलगाव येथे उतरली. ती रस्त्याने जात असताना पोलिसांना आढळली. ती मूक असल्याने संवाद होत नव्हता. प्रशासनाने तिला क्वारंटाइन कक्षात दाखल केले. दरम्यान, या महिलेला ताप असल्याच्या कारणावरून इर्विन रूग्णालयात  6 मे रोजी 108 रूग्णवाहिकेने दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना तपासणीही करण्यात आली. मात्र, ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य स्थितीत असूनही तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकला नाही आणि मग कुटुंबियांशी संपर्क कसा साधायचा, अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली. ही माहिती मिळताच महिला व बालकल्याण मंत्री ठाकूर स्वत: तज्ज्ञांच्या चमूसह येथील जिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी या महिलेची भेट घेऊन तिला कुटुंबापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेऊन दिलासा दिला. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने वॉर्ड क्रमांक 9 मध्ये सदर महिलेला ठेवण्यात आले होते. जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अधिपरिचारिका सिंधू खानंदे व इतर पारिचारिकांनी तिची काळजी घेतली. बोटांच्या ठस्यांच्या आधारे आधार प्रणालीतून शोध या महिलेच्या हाताच्या आधारे सांकेतिक भाषा जाणकारांकडून तिचे मूळ ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर महिलेचे फिंगर प्रिंट घेऊन ते आधार प्रणालीचा डेटा तपासून त्याआधारे शोधून काढण्याचे निर्देश  ठाकूर यांनी दिले. त्यानुसार, यंत्रणेकडूनही शोध मोहिम सुरूच होती. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले. आधार प्रणालीच्या साह्याने हातांच्या ठश्याच्या आधारे या महिलेचा पत्ता सापडला. हेही वाचा-मोठी बातमी! आता प्रशासकीय यंत्रणेच ऑपरेशन,आरोग्य मंत्र्यांनी घेतली आक्रमक भूमिका पालकमंत्री ठाकूर यांनी तिला पोहोचविण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. प्रशासनाकडून कुर्नुल जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. प्रवासाच्या आवश्यक परवानग्या तत्काळ मिळविण्यात आल्या. या महिलेसोबत तहसील कार्यालयाकडून प्रशांत पांडे सोबत निघाले. तहसीलदार संतोष काकडे, पालकमंत्र्यांचे ओएसडी रणजीत भोसले, ओएसडी प्रमोद कापडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, अधिपारिचारिका सिंधु खानंदे व त्यांच्या सहकारी, दै. लोकमतचे छायाचित्रकार मनीष जगताप अशा अनेकांचा या शोध मोहिमेत सहभाग होता. या मूक महिलेला तिच्या घरापर्यंत पोहोचून कुटुंबीय व आप्तांना भेटता येणार आहे, याचा मोठा आनंद आहे. कोरोना संकटकाळात अनेकजण ठिकठिकाणी अडकून पडले. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे, बस उपलब्ध करून देणे आदी प्रकारचे प्रयत्न होत आहेत. सगळ्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याचे प्रयत्न होत आहेत, असं ठाकूर यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Amravati, Congress, Yashomati thakur, यशोमती ठाकूर

पुढील बातम्या