सांगली, 24 मार्च : पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढत आज सांगलीत रंगणार आहे. यामध्ये सांगलीकर तुंग गावची महिला पैलवान प्रतीक्षा बागडी आणि कल्याणची पैलवान वैष्णवी पाटील यांच्यात सामना होणार आहे. कधीकाळी दोघी एकाच रूममध्ये राहत होत्या. मैत्रिणींमधील या लढतीची उत्सुकता आता सर्वांनाच लागून राहिली आहे.
महाराष्ट्र केसरीची गदा वैष्णवी पाटील सांगलीला मिळवून देणार की कल्याणची प्रतीक्षा बाजी मारणार हे आज सायंकाळी पाच वाजता समजेल. उपांत्य लढतीत प्रतीक्षा बागडीने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर मात केली. प्रतीक्षाने ९-२ अशा गुण फरकाने अमृताचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
Sangli News: महिला महाराष्ट्र केसरीचा थरार सुरू; 'या' मल्ल आहेत विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार, Video
दुसरी उपांत्य लढत कल्याणची वैष्णवी पाटील आणि कोल्हापूरची पैलवान वैष्णवी कुशप्पा यांच्यात झाली. यामध्ये वैष्णवी पाटीलने वैष्णवी कुशप्पाचा ११-१ ने पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली.
प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या हरयाणाच्या इसारमध्ये असताना ५ ते ६ महिने रूम पार्टनर होत्या. दोघींनाही एकमेकींच्या डावपेचांचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात त्या कोणता डावपेच वापरणार याची उत्सुकता असेल.
सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतीक्षा २१ वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथं सराव करते. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके पटकावली आहेत. खेलो इंडियामध्ये तिने रौप्य पदक जिंकलं होतं. तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात रौप्य पदकावर नाव कोरलं होतं.
कल्याणची वैष्णवी पाटील जय बजरंग तालीम संघ, नांदीवलीमध्ये सराव करते. तिने विशाखापट्टणममध्ये झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझपदक कमावलं होतं. १९ वर्षांची वैष्णवी पाटील ६५ किलो वजनी गटातून खेळते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wrestler