विजय देसाई, मीरा भाईंदर, 19 मार्च : बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांचा मुंबईतील दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजनाच्या सुरुवातीपासूनच वादात अडकला आहे. काँग्रेससह अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमाला विरोध केला. दरम्यान, मीरा रोड इथे पहिल्या दिवशीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलीय. तर पहिल्या दिवशी एक धक्कादायक प्रकारही कार्यक्रमात घडला. मोठ्या प्रमाणावर महिलांचे दागिने, मंगळसूत्र चोरीला गेले. या चोरीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी पुन्हा असे घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. तसंच कालच्या चोरी प्रकरणी महिला गँगला ताब्यात घेण्यात आलं आहे.
राज्यातील विविध भागांमधून लोक धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य दर्शनाला येत आहेत. पहिल्या दिवशी धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात महिलांचे मंगळसूत्र, चेन इत्यादी सोन्याचे दागिने चोरी झाले. याप्रकरणी चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला ताब्यात घेतलं आहे. तसंच पोलिसांची दहा पथके शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात कडक नजर ठेवली जात असल्याची माहिती क्राइम ब्रँच टीम अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली. चोरीच्या आलेल्या तक्रारींनुसार 65000 रुपये किंमतीची 4 मंगळसूत्रे आणि 32 सोन्याची चैनची एकूण किंमत 4 लाख 22 हजार रुपये इतकी होती.
लंडन मॅरेथॉनची सुरू होती तयारी, टेक फर्मच्या CEOचा इलेक्ट्रिक कारने चिरडल्याने मृत्यू
धीरेंद्र शास्त्री यांच्या कालच्या झालेल्या दिव्य दर्शन सोहळ्यात चोरी करणाऱ्या महिला गॅंगला मिरा रोड पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतलंय. त्यांची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. तसंच आज सकाळपासूनच सगळे गेट उघडे ठेवण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही, गर्दी होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. कालच्या कार्यक्रमात एकूण 36 जणांचे दागिने चोरी झाल्याची तक्रार मीरारोड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. अजून आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai