धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार, महिला आयोगानं घेतली दखल

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार, महिला आयोगानं घेतली दखल

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर परळीतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

  • Share this:

बीड़, 20 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभा असलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सुमोटो दाखल करणार आहे. तसेच ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई कऱण्यात येईल असंही राज्य महिला आयोगानं म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील विंडयाच्या सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत घोषणाबाजीही केली. यामुळे परळीत ऐन निवडणुकीत मतदानापूर्वी तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. यात त्यांनी म्हटलं की, शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन चुकीचं वक्तव्य केल्याचे आरोप फेटाळून लावले.

पंकजा मुंडे यांना भर सभेत भोवळ

भाजपच्या नेत्या आणि परळीतील उमेदवार पंकजा मुंडे यांना आपल्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत भोवळ आली. भोवळ येऊन स्टेजवर कोसळलेल्या पंकजा मुंडे यांना नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या बहीण आणि खासदार प्रितम मुंडे यांनी माहिती दिली आहे.

'सोशल मीडियातील काही गोष्टींमुळे ताई अस्वस्थ आहेत. साधा आणि सरळ स्वभाव असल्याने तिला हे सगळं सहन होत नाही. हे लोक प्रचंड घाणेरडं वागत असल्यानं ताईंना ते सहन झालं नाही. काल रात्रीपासूनच त्या अस्वस्थ होत्या. ताईंनी सांगितलंय की आता सगळ तुमच्या हातात आहे,' अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रितम मुंडे यांनी दिली आहे.

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या