कोल्हापूर, 17 डिसेंबर: मगरीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. शिरोळ तालुक्यातील कवठेसार गावात ही घटना समोर आली आहे. कुसुम अण्णा नांद्रेकर (वय-64) असं मृत महिलेचं नाव आहे. कुसुम अण्णा नांद्रेकर या गेल्या रविवारपासून बेपत्ता होत्या.
अखेर बुधवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह वारणा नदीच्या काठावर मगरीच्या बिळाजवळ अत्यंत छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे.
हेही वाचा...पुणे हादरलं! मावस बहिणींचं अपहरण करून दोन नराधमांकडून लैंगिक अत्याचार
मिळालेली माहिती अशी की, कुसूम नांद्रेकर या रविवारी मळीत गेल्या होत्या. यावेळी त्या पाणी पिण्यासाठी वारणा नदीकाठावर गेल्या असता त्यांच्या महिलेवर अचानक मगरीनं हल्ला केला. त्यानंतर कुसूम नांदरेकर या बेपत्ता होत्या. बुधवारी सायंकाळी त्यांचा मृतदेह वारणा नदीच्या काठावर मगरीच्या बिळाजवळ छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली. या घटनेमुळे वारणा नदीच्या काठावरील गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश...
या प्रकरणी प्रकाश नांद्रेकर यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून रितसर नोंद केली आहे. मात्र, या घटनेमुळे वारणा नदी काठच्या गावांमध्ये मगरीची दहशत पसरली आहे. दरम्यान, या घटनेची
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र यड्रावकर यांनी दखल घेतली आहे. डॉ. यड्रावकर यांनी याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. वनरक्षक गजानन सकट यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
हेही वाचा...पुण्यात अधिकाऱ्याचा राजीनामा, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शरद पवार थेट साताऱ्यात
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याजवळ सातवे येथील वारणा नदी काठावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महेश काटे या शेतकऱ्यावर मगरीनं हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी बैलानं उलट बाजूला ओढल्यामुळे महेश काटे या शेतकऱ्याचं प्राण थोडक्यात बचावले होते.