परभणी, 16 ऑक्टोबर: सोनपेठ शहरातील वाण नदीत बहीण-भावासह मामा अशा तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवम सुरेश मुळे (वय-8), शिवकन्या सुरेश मुळे( वय-15) आणि सचिन संभाजी बोडके (वय-20) अशी मृतांची नावं आहे.
शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. आपली दोन्ही चिमुकले पाण्यात बुडाल्याचं समजताच शिवम आणि शिवकन्याच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. तर एकाच कुटुंबातील तिघांचा नदीपात्रात बुडून करून अंत झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेनंतर सोनपेठ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या तिघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा..चिनी राष्ट्राध्यक्षांना कोरोना? संपूर्ण भाषणात खोकत होते Xi Jinping; पाहा VIDEO
मिळालेली माहिती अशी की, शिवम आणि शिवकन्या हे दोघे भाऊ-बहीण वाण नदी परिसरात खेळण्यासाठी गेले होते. मात्र, नदीला पूर असल्यामुळे दोघे पाण्यात बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी मामा सचिन बोडके यानं पाण्यात उडी घेतली. मात्र, त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील वाण नदीपात्रामध्ये ही हृदयद्रावक दुर्घटना घडली.
शिवम आणि शिवकन्या हे आपल्या आईसोबत कपडे धुण्यासाठी नदीवर गेले होते. नदीपात्रामध्ये खेळत असताना अचानक हे दोघेही पाण्यामध्ये बुडू लागले. थोड्या अंतरावर असलेल्या मामा सचिन याच्या लक्षात येताच त्याने आपल्या भाचा-भाचीला वाचवण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. परंतु पोहता येत नसल्यानं त्याचीही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढले. एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याने, निमगाव मध्ये शोककळा पसरली आहे.
पुण्यात भिडे पुलावरून पडून 2 तरुण गेले वाहून
दुसरी अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. सेल्फी काढण्याचा मोह 2 तरुणांच्या जीवावर बेतला आहे. सेल्फी काढताना तोल जाऊन दोन्ही तरुण पुण्यातील भिडे पुलावरुन मुठा नदीच्या पुरात वाहून गेले. ओम तुपधर (वय-17) आणि सौरभ कांबळे (वय- 20, दोघे रा. ताडीवाला रोड) अशी पुरात वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत.
ताडीवाला परिसरात राहणारे दोघे डेक्कनला नवरात्र, दसरा सणासाठी कपडे खरेदीसाठी आले होते. भिडे पुलावर फोटो काढण्यासाठी एक जण थांबला असता पाण्याचा प्रवाह वाढला. मित्र वाहत आसताना वाचवायाला गेलेला तरुणही गेला वाहून गेला. अग्निशमन दलाकडून दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
हेही वाचा...COVID-19: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 85 टक्क्यांवर
दरम्यान, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. ओम हा भिडे पुलावर सेल्फी काढत होता. ओम तोल जावून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी सौरभनेही पाण्यात उडी घेतली मात्र तोही वाहून गेला. तिसऱ्या मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.