मुंबई, 26 मे: मागील आठवड्यात देशाच्या पश्चिम किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळानं (Tauktae Cyclone) जोरदार तडाखा दिला आहे. यानंतर आता देशाच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळ (Yaas Cyclone) येऊन धडकलं आहे. त्यामुळे मागील काही तासांपासून ओडिशात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. यास चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालसहित अन्य राज्यांच्या देखील चिंता वाढताना दिसत आहेत.
अशात यास चक्रीवादळाचा राज्यातील मान्सूनवर (Monsoon in maharashtra) परिणाम करेल की नाही? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. यास चक्रीवादळाची तिव्रता तौत्के चक्रीवादळापेक्षा जास्त असली तरी याचा राज्यातील मान्सूनवर काहीही परिणाम होणार नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. देशात अजूनही किमान 40 टक्के शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. अशा स्थितीत यास चक्रीवादळामुळे मान्सून वेळेवर येणार की नाही ? याबाबत शेतकऱ्यांना चिंता लागली होती.
यास चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम होणार का?
भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत मुंबईतही मान्सून दाखल होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाला सुरुवात होण्यासाठी 20 ते 25 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. यास चक्रीवादळाचा राज्यातील मान्सूनवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चिंता करण्याची काहीही गरज नसल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
हे वाचा-कोरोनाचा सौम्य संसर्ग असणाऱ्यांमध्ये तयार होतंय Antibody Protection,वाचा सविस्तर
पुढील पाच दिवसांत (31 मे) रोजी केरळात नैऋत्य मोसमी वारे दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पण केरळनंतर इतर राज्यात कधी मान्सून दाखल होईल? याबाबत हवामान खात्याकडून अद्याप कोणती माहिती देण्यात आली नाही. पण केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसांत महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्याच आगमन होतं. पण मागील 48 तासांत नोंदल्या गेलेल्या नोंदीनुसार राज्यात मान्सून आगमन होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.