महाराष्ट्रात ठाकरे सरकार राबवणार शिवराज पॅटर्न? वीज बिलाबाबत लाखो नागरिकांना होईल फायदा

महाराष्ट्रात ठाकरे सरकार राबवणार शिवराज पॅटर्न? वीज बिलाबाबत लाखो नागरिकांना होईल फायदा

शिवराजसिंह चौहान यांनी वीजबिलाबाबत राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जून : राज्य आणि देशावरील कोरोना संकट अजून दूर झालेलं नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अशातच काही नागरिकांना मोठ-मोठी वीजबिले आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वीजबिलाबाबत राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रातही राबवला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळातील वीज बिल मध्य प्रदेश सरकारकडून 50 टक्के कमी करण्यात आलं आहे. एप्रिलमध्ये 100 रुपयांपर्यंत वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना मे, जून आणि जुलैमध्ये फक्त 50 रुपये भरावे लागतील. तर जे ग्राहक 100 ते 400 रुपयांपर्यंत बिल भरत होते अशा ग्राहकांना केवळ 100 रुपये भरावे लागतील. तर 400 रुपयावरून अधिक बील देत असलेल्या ग्राहकांचं अर्ध वीज बिल माफ होणार आहे.

देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी

'कोरोनामुळे 3 महिन्यांपासून टाळेबंदी होती. या तीन महिन्यांत घरगुती ग्राहकांना सरासरी बिले पाठवण्यात आली आणि ती त्यांनी भरली. आता परवानगी दिलेल्या ठिकाणी रिडिंग घेऊन बिले पाठविल्याचे सांगण्यात आले आहे. ती बिले आकारताना त्यात जुनी भरलेली रक्कम वजा न करण्यात आल्याने प्रचंड रकमा बिलाच्या देयकापोटी भरण्यास घरगुती नागरिकांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. कोरोना टाळेबंदीमुळे अनेकांना वेतनाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अशात एकदम तीन महिन्यांची विजबिले आल्यामुळे ती एकरकमी भरण्याच्या समस्या त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. दहा-दहा हजार रूपयांपर्यंत बिले नागरिकांना आली आहेत,' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

'एकीकडे ही समस्या असताना दुसरीकडे औद्योगिक ग्राहकांची सुद्धा तीच अवस्था आहे. तीन महिने उद्योग बंद असताना सुद्धा त्यांना भरमसाठ वीजबिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनाही आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. घरगुती ग्राहक आणि उद्योग अशा दोघांच्याही समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. सरासरी भरलेली बिले आणि आता तीन महिन्यांचे एकत्रित देयक यामुळे प्रचंड आर्थिक भार घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांवर पडला आहे. एकतर घरगुती ग्राहकांकडून टाळेबंदीच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. त्यावर कुठलाही निर्णय न घेता सरसकट बिले पाठविण्यात आली आहेत,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या वेदना सरकारकडे मांडल्या आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 22, 2020, 9:19 PM IST

ताज्या बातम्या