साहेबराव कोकणे, प्रतिनिधी
अहमदनगर, 19 जानेवारी : 'भाजपात मी जाणार नाही, आघाडीने जर तिकीट दिले नाहीतर अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार',अशी घोषणाच डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे पाटील यांचा युवक मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. 'गेल्या तीन पिढ्यांपासून समाजाची सेवा करत आलो असून पुढेही सर्वसामान्यासाठीच कार्य करणार आहे. पण या पुढच्या काळात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीकडे आपण उमेदवारीचा आग्रह धरणार आहे. पण काही अडचणीतून उमेदवारी त्यांनी दिली नाही किंवा माझ्यापेक्षा चांगला उमेदवार जर मिळाला तर मी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार', असं सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे.
मध्यंतरी, "वडील काँग्रेसमध्ये असतील आणि मुलगा दुसऱ्या पक्षात असावा म्हणजे याचा अर्थ असा होतं नाही की, वडील ज्या पक्षात आहे त्या पक्षात मुलानंही राहिलं पाहिजे. माझं स्वतंत्र मत आहे. मला स्वतंत्र नेतृत्त्व मान्य असेल तर मी तिथे जाईल. भलेही कुटुंबाचा विरोध असला तरी मी थांबणार नाही" असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार का या चर्चेला उधाण आलं होतं. परंतु, आता त्यांनी अपक्ष लढवण्याची तयारीच बोलून दाखवली आहे.
=============================