गिरीश महाजन यांच्या जामनेरात पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची केली हत्या

गिरीश महाजन यांच्या जामनेरात पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची केली हत्या

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ, 28 एप्रिल- राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नाही तर हा प्रकार कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून रातोरात जेसीबी यंत्राद्वारे खड्डा खोदून प्राण्यांची मृतदेह जमिनीत पुरण्यात आले आहेत.

काय आहे हे प्रकरण?

जामनेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना शनिवारी (ता.27) याबाबत माहिती मिळाली. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी खोदकामानंतर या प्रकारातील सत्य उघडकीस आले.

सरदार सरोवर प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यात जामनेर तालुक्यातील सोनाळा शिवारात गट क्रमांक 148 ते 152 पर्यंतचे गट पर्यायी वनीकरणासाठी वन विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यात बऱ्यापैकी वृक्ष बहरलेले असून जवळच दोन धरणे असल्याने या जंगलात वन्य प्राण्यांची संख्याही चांगली आहे. परंतु, पर्यायी वनीकरणाला लागूनच पिंपळगाव व सोनाळा शिवार असून अनेक शेतकऱ्यांची तेथे शेती आहे. यामुळे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रासही होतो. वन्यप्राणी त्रास देतात म्हणून सोनाळा येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी पाण्याच्या हौदात विष टाकले होते. यात जवळपास 15 मोर, 10 माकडे, एक काळवीट व एका नीलगायचा मृत्यू झाला. गावातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला होता. काहींनी मोबाइलमध्ये फोटोही काढले होते. परंतु, गावातीलच रहिवासी असल्याने वाद नको म्हणून हा प्रकार वन विभागापर्यंत पोहोचला नाही. गावात मात्र याबाबत आपापसात चर्चा सुरु होती. अखेर शनिवारी रात्री हा प्रकार जामनेर वन विभागाचे वन क्षेत्रपाल समाधान पाटील यांच्या कानावर आला. त्यांनी शनिवारी रात्रीच घटनास्थळी जाऊन कर्मचारी व वन मजुरांकडून संशय असलेल्या ठिकाणी खोदून पाहिले असता माकडांचे मृतदेह आढळून आले. रात्री उशीरापर्यंत हे खोदकाम सुरू होते.एका शेतात वन्यप्राण्यांना पुरल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी खोदून पाहिले असता माकडांचे मृतदेह आढळून आले.

हौदातील विषारी पाणी प्यायल्याने मृत झालेले वन्यप्राणी पाहता आपल्यावर कारवाई होऊ शकते. यामुळे संबंधित शेतकऱ्याने एका जेसीबी यंत्राच्या सहाय्याने ठिकठिकाणी खड्डे करून वन्य प्राण्यांचे मृतदेह गाडले आहेत. याबाबत माहिती मिळताच वन क्षेत्रपाल समाधान पाटील, फॉरेस्ट गार्ड प्रसाद भारूडे, वनपाल संदीप पाटील, वन मजूर जीवन पाटील यांना घेऊन सोनाळा जंगलात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहिले असता जेसीबीच्या चाकांचे ठसे दिसून आले. जेसीबीच्या चाकोरीनूसार शोध घेतला असता विहिरीजवळ पडीक भागात खड्डा करून तो बुजलेला दिसला. त्या ठिकाणी खोदले असता माकडांचे मृतदेह आढळले.

वन्य प्राण्यांची हत्या हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच या गुन्ह्यातील वन्य प्राण्यांचे मृतदेह पुरण्यासाठी मदत करणे हा देखील गंभीर गुन्हा आहे. एका जेसीबी यंत्राद्वारे खड्डे खोदून वन्य प्राण्यांचे मृतदेह पुरल्याचे समोर आल्याने ते जेसीबी कुणाचे होते. त्याने वन विभागाला माहिती न देता हा गुन्हा दडपण्यास सहकार्य केल्याने, तोही गुन्हेगार होऊ शकतो. त्यामुळे ते जेसीबी कुणाचे होते व चालक कोण होता? तर हा प्रकार करणाऱ्या शेतकऱ्यासह जेसीबी व त्यावरील चालकाचा शोध घेऊन त्यावर वन विभाग कारवाई करणार का? गिरीश महाजन या प्रकरणात लक्ष घालणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

'याबाबत सखोल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्या मृत प्राण्यांना पुरण्यात आले. याबाबत घटनास्थळाचा शोध घेऊन उत्खनन केले असता माकडांचे मृतदेह हाती लागले आहेत. मात्र, रात्र झाल्याने पुढील आणखी काही घटनास्थळांचा शोध घेऊन सर्व दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.'

- समाधान पाटील, वन क्षेत्रपाल जामनेर

SPECIAL REPORT : उदयनराजे, धनंजय मुंडे आणि महाजनांचा काय आहे फिटनेस मंत्रा?

First published: April 28, 2019, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading