विधवांनाही दिलं संक्रांतीचं वाण...अनिष्ठ रूढी परंपरांना दिला फाटा

विधवांनाही दिलं संक्रांतीचं वाण...अनिष्ठ रूढी परंपरांना दिला फाटा

परंपरेला फाटा देत विधवांना संक्रांतीचं वाण देऊन यथोचित सन्मान केला. विधवांच्या दुःखावर आनंदाची फुंकर घातली.

  • Share this:

किशोर गोमाशे,(प्रतिनिधी)

वाशिम,20 जानेवारी:आपल्याकडे विधवा महिलांना शुभ व धार्मिक उपक्रमापासून दूर ठेवण्याची परंपरा आहे. एखाद्या महिलेला वैधव्य येणं हे तिच्या हातात नसतं. अगोदरच त्या महिलेचा जोडीदार या जगातून गेल्यामुळे तिचं आयुष्य कठीण होऊन बसतं. त्यातच अनिष्ठ परंपरांमुळे तिला वर्षभरातील अनेक सण, शुभ प्रसंग अथवा धार्मिक विधींपासून दूर ठेवले जात असल्याने त्या महिलेच्या दुःखात अधिकची भर पडते. विधवांचं दुःख समजून सौभाग्यवती स्त्रियांचा सण समजल्या जाणाऱ्या मकर संक्रांती निमित्त किरण गिऱ्हे या समाजसेविकेने परंपरेला फाटा देत विधवांना संक्रांतीचं वाण देऊन यथोचित सन्मान केला. विधवांच्या दुःखावर आनंदाची फुंकर घातली.

मकरसंक्रांतीचा महिना हा महिलांसाठी आनंदाची पर्वणीच असते. सर्वत्र सवाष्ण महिला सुंदर कपडे दागदागिने घालुन हळदी कुंकूसाठी एकत्र येतांना दिसतात. एकंदरीत सर्वत्र आनंदाचे आणि उल्हासाचे वातावरण असते. पण समाजातला एक महिला वर्ग असा आहे. ज्यांना काही कारणास्तव वैधव्य आलं आहे. पतीचे छत्र हरवलेल्या या महिला प्रत्येक आनंदी वातावरणापासून दूर असतात. अनेक धार्मिक आणि रूढीबद्ध कार्यक्रमात त्यांना स्थान नसते.

त्यांचं दुःख समजून सामाजिक कार्यकर्त्या किरण समाधान गिऱ्हे यांनी या परंपरेला मूठमाती दिली. किरण गोऱ्हे यांनी 40 विधवा महिलांना संक्रांती निमित्त तीळगुळासह भेटवस्तूंचं वाण देऊन त्यांचा यथोचीत सन्मान केला. जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याबाईंच्या त्यागाची उदाहरणे देऊन त्यांची वैचारिक क्षमता मजबूत केली.

पतीचं निधन झाल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये कायम दुःख असते. आम्हाला कोणत्याही शुभप्रसंगी बोलवण्यात येत नसल्याने त्याचं दुःख होतं. स्त्रियांचा सण असलेल्या संक्रांतीलाही आम्हाला केवळ विधवा असल्याने बोलवण्यात येत नाही. मात्र, किरणताईंनी आम्हाला बोलवून मकरसंक्रांतीचं वाण दिल्याने आमचं दुःख काही प्रमाणात हलकं झालं असून समाजानं किरणताई सारखी विचार सरणी अंगिकारल्यास आमचं जगणं सुसह्य होईल, असं अलका धामणकर यांनी सांगितलं.

दरम्यान, ज्या विधवा महिला आनंदापासून वंचित राहतात त्यांना किरणताई गिऱ्हे या समाजसेविकेने संक्रांतीचं वाण देऊन थोडा का आनंद होईना मात्र तो परत मिळवून दिलाय. असेच उपक्रम समाजात राबविल्या गेले तर अशा विधवा महिलांचे आयुष्य कायम आनंदमय होईल.

First published: January 20, 2020, 9:52 PM IST

ताज्या बातम्या