महिलेला चार तरुणांनी रॉकेल टाकून पेटवले, नाशकात घडली धक्कादायक घटना

महिलेला चार तरुणांनी रॉकेल टाकून पेटवले, नाशकात घडली धक्कादायक घटना

नाशिकच्या लासलगाव बस स्थानकाच्या परिसरात ही घटना घडली आहे

  • Share this:

लासलगाव, 15 फेब्रुवारी : हिंगणघाटमध्ये प्राध्यापिका तरुणीला जळीत प्रकरण उलटत नाही तेच नाशिकमध्येही एका महिलेला जिवंत पेटवण्याची खळबजनक घटना घडली आहे. चार तरुणांनी बस स्थानकावर या महिलेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

नाशिकच्या लासलगाव बस स्थानकाच्या परिसरात ही घटना घडली आहे. चार ते पाच तरुणांनी या महिलेला गाठलं आणि शिवीगाळ करत तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. महिलेला पेटवून दिल्यानंतर हे तरूण तिथून पसार झाले. स्थानिकांनी वेळीच धाव घेऊन आग विझवली. या महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही महिला ४० टक्के भाजली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. पीडित महिला ही लासलगाव जवळील पिंपळगाव नजीकच्या गावात राहणारी आहे. या महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.

दरम्यान, महिलेला पेटवून दिल्यानंतर फरार झालेल्या पैकी पोलिसांनी निलेश पद्माकर केंदळे आणि  दत्तू बाळू जाधव या दोघा संशयितांना अटक केली आहे.  तर मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत हा अजून ही फरार असून त्याचा  शोध घेतला जात आहे.

अहमदनगरमध्ये तरुणाने घेतले पेटवून!

दरम्यान, अहमदनगरमध्येही एका तरुणाने पेटवून घेण्याची घटना घडली आहे. अहमदनगर पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर निरंजन नाईक या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कौटुंबिक वादातून त्याने आत्महतेचा प्रयत्न केला. पोलीस आपल्या तक्रारीची दखल न घेतल्याने  त्याने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. परंतु, त्याचवेळी तिथे उपस्थितीत असलेल्या स्थानिकांनी आग विझवून या तरुणाला वाचवलं. या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हिंगणघाट जळीत हत्याकांड

माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न विकी नगराळे या युवकाने केला होता. यात गंभीर अवस्थेत जळाल्याने, पीडितेला नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नराधमाला तातडीने शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

First published: February 15, 2020, 6:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading