'पश्चिम बंगालमधील CBI ड्रामा पाहून शिवसेनेनं भाजपसमोर नांगी टाकली?'

'पश्चिम बंगालमधील CBI ड्रामा पाहून शिवसेनेनं भाजपसमोर नांगी टाकली?'

कोलकात्यातील सीबीआयचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहून शिवसेना भाजपसोबत युतीसाठी तयार झाली का? असा सवाल आता विचारला जात आहे.

  • Share this:

4 फेब्रुवारी, मुंबई : 'मी कुणाच्याही पुढे युतीचा कटोरा घेऊन जाणार नाही' अशी डरकाळी फोडत स्वाभिमान, मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत शिवसेनेनं 'छट, युती होणारच नाही'! अशी भूमिका घेतली. अखेर 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' अशी स्थिती असलेल्या शिवसेना - भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युतीसाठी बोलणी सुरू केल्याची माहिती समोर आली. भाजप 25 तर, शिवसेना 23 जागा लढणार आहे. पण, सध्या घोडं अडलंय ते भिवंडीच्या जागेवरती! शिवसेना भिवंडीच्या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे ही जागा कुणाच्या वाट्याला जाणार यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. शिवसेनेनं मुंबईतील पालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वबळाचा नारा दिला आणि सेनेला भाजपने प्रत्युत्तर देत 'पटक देंगे' असा पवित्रा घेतला. गेले दोन दिवस युती होणार याबाबत सकारात्मक भावना दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त होत होती, पण जागा वाटपाचं त्रांगडं काही सुटत नव्हतं. सोमवारी दिवसभरात अशा काही घटना घडल्या की युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

कोलकात्यातील सीबीआयचा ड्रामा पाहून शिवसेना नरमली ?

शिवसेना - भाजपमधील युतीची चर्चा पाहून स्वाभिमानाची भाषा करणारी शिवसेना आता वरमली आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याबद्दल विचारले असता, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणाले, "स्वबळाचा नारा हे शिवसेनेचं दबावतंत्र होतं. शिवाय, भाजपसोबत न गेल्यास सत्तेचा वाटा मिळून शकत नाही हे शिवसेनेला माहिती आहे. त्यामुळे शिवसेना युतीचा निर्णय घेईल."

काल दिवसभरात बंगालमध्ये घडलेल्या घटनांचा युतीच्या चर्चेवर परिणाम झाला असावा, असं मतही अकोलकरांनी व्यक्त केलं. "पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारे केंद्र सरकारनं सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर केला. तसा वापर शिवसेनेच्या विरोधात होऊ शकतो. म्हणून शिवसेनेनं भाजपसमोर नांगी टाकली", असं मत प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातमी भाजप-शिवसेना युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; 25-23चा फॉर्म्युला फायनल होणार?

शिवसेनेनं आत्तापर्यंत दबावाचं राजकारण केलं. देशातील सध्याची राजकीय स्थिती पाहता युती होणं ही शिवसेना - भाजपसाठी अपरिहार्य गोष्ट आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांनीही व्यक्त केलं. "एकीकडे आघाडीच्या चर्चा जोरात सुरू असताना शिवसेना - भाजपमध्ये चर्चा न होणं राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. शिवाय, युती न झाल्यास त्याचा फटका शिवसेना - भाजपला बसू शकतो", असं मत प्रकाश जोशी यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेची साथ ही भाजपची गरज?

'याल तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्या शिवाय' अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. शिवाय, तुमच्या मागून फरफटत येणार नाही अशा शब्दात देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. दरम्यान, शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी भाजपनं देखील पराकोटीचे प्रयत्न केले. तर, देशातील सध्याची राजकीय स्थिती पाहता शिवसेनेची साथ ही भाजपसाठी मदतीचा हात ठरू शकते का? अशी चर्चा देखील सध्या जोरात सुरू आहे.

First published: February 4, 2019, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading