मुंबई 27 मे : महाराष्ट्र हे आता वाघांसाठी ओळखं जाणार आहे. गेल्या चार वर्षात राज्यातील वाघांची संख्या 20 ते 25 टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.
2014मध्ये वाघांची संख्या 2014 एवढी होती. ती वाढून आता वाघांची संख्या 252 झाली असण्याची शक्यता आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यात व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गांभीर्याने पाऊले उचलण्यात येत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले तसेच आज त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या बैठकीत या विषयाच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक आज मंत्रालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या २०१९-२० मध्ये करावयाच्या विविध कामांना तसेच प्रस्तावित तरतुदींना मान्यता देण्यात आली.
व्याघ्र प्रकल्पक्षेत्रातील स्थानिकांसाठी रोजगार
व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात राहणाऱ्या स्थानिकांना सोयी- सुविधा उपलब्ध करून दिल्या तर त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी होईल, त्यांचे वनात जाण्याचे प्रमाण कमी होईल ही बाब विचारात घेऊन कामाचे नियोजन केले तर मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होऊ शकते असं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलं. राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये ५०० महिलांसाठी शिलाई मशिन युनिट स्थापन केले जाणार आहे. त्यांना कापडी पिशव्या तयार करणे, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश शिवणे, वन कर्मऱ्यांचे ड्रेस शिवणे अशा माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर त्या मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ साखळी विकसित केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.