महाराष्ट्रातच कोरोनाबाधितांची संख्या इतकी जास्त का आहे? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

महाराष्ट्रातच कोरोनाबाधितांची संख्या इतकी जास्त का आहे? वाचा काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं

देशभरातली सर्वाधिक रुग्ण वाढ महाराष्ट्रातून होत आहे. तसंच, कोविड 19 च्या रुग्णांत गुंतागुंत होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाणही महाराष्ट्रात जास्त आहे. देशभरातल्या 1.29 कोटी कोरोनाबाधितांपैकी सुमारे 32 लाख कोरोनाबाधित महाराष्ट्रातले आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : सध्या देशभर कोरोना संसर्गाची दुसरी लाट (Second Wave) फैलावली आहे. महाराष्ट्रात तिचं स्वरूप भयावह आणि चिंताजनक आहे. रोजच्या नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नजर टाकली, तर हे सहज लक्षात येईल, की देशभरातली सर्वाधिक रुग्ण वाढ महाराष्ट्रातून होत आहे. तसंच, कोविड 19 च्या रुग्णांत गुंतागुंत होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाणही महाराष्ट्रात जास्त आहे. देशभरातल्या 1.29 कोटी कोरोनाबाधितांपैकी सुमारे 32 लाख कोरोनाबाधित महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाचा संसर्ग (Covid19) झालेला चौथा रुग्ण महाराष्ट्रातला आहे.

महाराष्ट्र हे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेलं राज्य का आहे, असा प्रश्न साहजिकपणे उपस्थित होतो. लोकांकडून मास्क नीट लावला न जाणं, गर्दी करणं हे प्रकार देशात सगळीकडेच दिसतायेत. पण मग महाराष्ट्रातच कोरोनाबाधितांची संख्या इतकी जास्त का आहे?

लोकसंख्या आणि शहरीकरण (Population & Urbanisation) -

वरच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला संसर्ग पसरण्याच्या विविध पैलूंकडे पाहायला हवं. पहिलं अगदी सहज लक्षात येणारं कारण म्हणजे महाराष्ट्राची मोठी लोकसंख्या. उत्तर प्रदेशनंतर (UP) महाराष्ट्र हे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात त्याहूनही जास्त रुग्णांची नोंद होतेय. तसंच, महाराष्ट्रापेक्षा जास्त लोकसंख्या असूनही उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या तुलनेत कमी रुग्णसंख्या का आहे, असाही प्रश्न पडू शकतो. त्यामागची कारणं शोधायला हवीत.

डेंग्यूबद्दलचे (Dengue) तज्ज्ञ ड्वेन गब्लर यांनी 'डेंग्यू, अर्बनायझेशन अँड ग्लोबलायझेशन - अनहोलट्रिनिटी ऑफ ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी' या शोधनिबंधात असं म्हटलं आहे, की डेंग्यूची साथ उद्भवण्यासाठीच्या महत्त्वाच्या घटकांमध्ये शहरीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. हाच घटक कोविड19 च्या साथीलाही (Covid19 Pandemic) लागू पडतो.

कोविड-19 चा संसर्ग पसरण्याचं प्रमाण खासकरून शहरांत जास्त आहे. महाराष्ट्रातल्या कोविड-19च्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार महानगरांमधले आहेत. त्यावरून शहरीकरण हा कोविड-19 संसर्गातला महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात येतं. महाराष्ट्र हे देशातल्या सर्वाधिक (म्हणजे 50 टक्क्यांहून जास्त) शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक आहे. शहरीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राची तुलना केवळ केरळ आणि तमिळनाडूशी होऊ शकते. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश ही पाच सर्वाधिक लोकसंख्येची राज्यं आहेत. मात्र उत्तरप्रदेश आणि बिहारमधल्या शहरीकरणाचं प्रमाण अनुक्रमे 22 आणि 11 टक्के एवढंच आहे. तसंच, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधली सुमारे 70 टक्के जनता ग्रामीण भागांत राहते. या घटकाचा कोविड 19 च्या संसर्गाच्या प्रमाणाशी मोठा संबंध आहे.

(वाचा - घाबरू नका, पण सावध राहा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक बातमी)

जागतिक पातळीवरही सर्वांत विकसित आणि शहरीकरण झालेल्या देशांमध्ये कोविड-19 च्या रुग्णांची संख्या जास्त आहे.महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यांमध्ये होणाऱ्या स्थलांतराचं (Migration) प्रमाणही जास्त असतं. शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी अन्य राज्यांतूनही, अन्यठिकाणांहून लोक इथे येत असतात. दिल्ली आणि उत्तर प्रदेशाशी तुलना केल्यानंतर हा मुद्दा अधिक स्पष्ट होऊ शकेल. 'दिल्ली-एनसीआर'ची (Delhi-NCR) लोकसंख्या तीन कोटी म्हणजे उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येच्या एक नवमांश आहे. तरीही उत्तर प्रदेश या देशातल्या सर्वांत जास्त लोकसंख्येच्या राज्यापेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद दिल्लीतून होत आहे. शहरीकरण आणि लोकसंख्येची जास्त घनता हे मुद्दे चित्र स्पष्ट करायला मदत करतात.

आकडेवारीचं आकलन अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी वेगळ्या दृष्टिकोनातूनही तिच्याकडे पाहायला हवं. अनेकदा केवळ कोरोनाबाधितांच्या संख्येतून खरं चित्र उभं राहत नाही. अशा वेळी दर 10 लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधितांची संख्या किती हा मुद्दा संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातल्या कोरोना संसर्गाचं नेमकं चित्र स्पष्ट करायला मदत करतो.

राज्य/ केंद्रशासित प्रदेश आणि दर 10 लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधितांची संख्या

गोवा : 39,109

लडाख : 35,535

दिल्ली : 34,852

केरळ : 32,586

पुदुच्चेरी : 28,751

महाराष्ट्र : 25,977

या आकडेवारीकडे पाहिल्यावर हे लक्षात येतं, की कोरोना संसर्गाचं महाराष्ट्रा इतकंच (Maharashtra) किंबहुना जास्त प्रमाण अन्य राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतही आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की शहरीकरण ही स्वतंत्रपणे घडणारी घटना नाही. औद्योगिकीकरण, वेगाने स्थलांतर, परवडणाऱ्या घरांचा मुद्दा आणि सतत वाढणाऱ्या शहरी लोकसंख्येला जीवनावश्यक सेवांचा पुरवठा करणं हे सगळे मुद्दे त्यात येतात.

शहरी भागांमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारीकरणाचा वेग लोकसंख्यावाढीच्या वेगाएवढा राहत नाही. भोरे समितीने 1940 च्या दशकात केलेल्या शिफारशींमुळे आपल्याकडे ग्रामीण भागांमध्ये तरी किमान पायाभूत आरोग्य सुविधा आहेत. पण नॅशनल अर्बन हेल्थ मिशन (National Urban Health Mission) ही तुलनेने नवी योजना आहे. महाराष्ट्रात 27 महानगरपालिका असून, सुमारे 400 नगरपालिका आहेत. नागरी लोकसंख्येला किमान आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणं हे महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यांपुढचं खरं आव्हानआहे. कोविड-19 च्या साथीवर या साऱ्या घटकांचाही परिणाम आहे, याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही.

(वाचा - सर्दी-ताप नाही तर आता अशी लक्षणं; दुसरी लाट, नव्या स्ट्रेनसह कोरोनाचं भयंकर रूप)

प्रभावी सर्वेक्षण यंत्रणा -

साथीच्या रोगांचा फैलाव झालेला असताना ज्या राज्यात संवेदनशील आणि प्रभावी सर्व्हेलन्स सिस्टीम (Surveillance System) अर्थात सर्वेक्षण यंत्रणा आहे, तिथे साहजिकच जास्त रुग्णांची नोंद होणार. गेल्या दशकात आलेल्या स्वाइनफ्लू (Swine Flu) आणि डेंग्यूच्या साथीच्या आकडेवारीकडे पाहिलं, तरी हेच लक्षात येईल, की महाराष्ट्रातली रुग्णसंख्या जास्तच होती. केरळच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल आपण सगळे जाणतोच. नवजात अर्भकांचा मृत्यू, माता मृत्यू आदींच्या बाबतीत केरळची तुलना अनेक विकसित देशांशी केली जाते.

केरळ (Kerala) हे लोकसंख्येच्या बाबतीत भारतातलं 13 वं राज्य आहे. पण प्रभावी आणि पारदर्शक सर्व्हेलन्स सिस्टीममुळे देशातल्या सर्वाधिक कोविड रुग्णांच्या बाबतीत केरळचा दुसरा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशची लोकसंख्या केरळच्या जवळपास तिप्पट आहे. पण केरळमध्ये उत्तरप्रदेशच्या तुलनेत दुप्पट कोरोनाबाधितांची नोंद झाली. शास्त्रीय भाषेत सांगायचं तर, याला 'रिपोर्टिंग बायस' असं म्हणता येईल. कोविड-19 च्या आकडेवारीचं विश्लेषण करताना हे सगळं आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.

विषाणूने स्वतःत केलेले जनुकीय बदल म्हणजेच म्युटेशन्सबद्दलही (Mutations) बरीच चर्चा होत आहे. संसर्ग वाढण्याला ते काही प्रमाणात कारणीभूत आहेत. हवामानाची कोरोना संसर्गाच्या फैलावात नेमकी भूमिका काय, हे अद्याप आपल्याला कळलेलं नाही. संसर्ग नेमका कसा होतोय, हे समजून घेण्यासाठीआपल्याला संपूर्ण समुदाय किंवा राज्याकडे पाहण्याची गरज आहे. आकडेवारीचं आपण परिपूर्ण माहिती किंवा ज्ञानात रूपांतर केलं नाही, तर आकडेवारीला काही अर्थ नाही. या महामारीच्या लाटा आपली आर्थिक आणि सामाजिक समृद्धी अक्षरशः धुऊन काढत आहेत. आकडेवारीकडे तुम्ही हवं तसं पाहू शकता, पण ज्ञानपूर्ण कृतीकेली नाही, तर ती आकडेवारी व्यर्थ आहे. आगामी दशकात आपल्याला सार्वजनिक आरोग्य या विषयावर आणि त्यातही शहरांवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागणारआहे. कोणी ऐकू इच्छित असेल, तर यातून स्पष्ट संदेश मिळाला आहे.

First published: April 10, 2021, 7:54 PM IST

ताज्या बातम्या