Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री 'मातोश्री'तून बाहेर का पडत नाही? शरद पवारांनी दिले उत्तर...

मुख्यमंत्री 'मातोश्री'तून बाहेर का पडत नाही? शरद पवारांनी दिले उत्तर...

संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या या भागाची पाहणी करणार आहे'

    उस्मानाबाद, 19 ऑक्टोबर :  राज्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. पण, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतून बाहेर पडत नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत विरोधकांना फटकारून काढले आहे. आम्ही सर्व जण फिल्डवर आहोत, त्यामुळे त्यांना मुंबईत राहण्याची विनंती केली होती, असा खुलासा पवारांनी केला. शरद पवार यांनी उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची रविवारी पाहणी केली होती. त्यानंतर आज तुळजापूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाहेर पडत नाही, असा विरोधकांचा आरोप आहे, असा सवाल केला असता पवार म्हणाले की, राज्यावर सध्या मोठे संकट आले आहे. जेव्हा राज्यावर एखादे मोठे संकट येते तेव्हा प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी एका व्यक्तीला मुंबई राहून नियोजन करावे लागते. आम्हीच मुख्यमंत्र्यांना मुंबईत राहून निर्णय घेण्याचे सांगितले होते. त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. आम्ही सर्व नेते फिल्डवर उतरलो आहेत, त्यामुळे सर्वांनीच पाहणी करावी अशी आवाश्यकता नसते, असं सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. तसंच, 'महाराष्ट्र मोठ्या संकटाला समोर जात आहे. काही ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारला जी काही मदत करायची आहे, ती मदत करत असतो. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या या भागाची पाहणी करणार आहे. त्यांनी या भागाची पाहणी करून कर्ज काढावे आणि लोकांना या संकटातून बाहेर काढावे' असंही पवार म्हणाले. 'पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर मदत करण्यासाठी आश्वासन दिले आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही राजकारणी एकमेकांची जी काही मदत घ्यायची ती घेतो. भूजमध्ये भूकंप आला होता. तेव्हा  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. भाजपचे पंतप्रधान असताना  त्यांनी पक्ष न बघता मदत केली होती. देवेंद्र फडणवीस इथं येणार असतील तर स्वागतच आहे.आणखी कुणी काही करत असतील तर स्वागत आहे. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवार यांनी आजचा दौरा रद्द केला आहे. रविवारी परांड्यात झालेल्या पावसामुळे हेलिपॅड खराब झाले आहे. त्यामुळे तिथे हेलिकॉप्टर उतरण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा दौरा पवारांना करता येणार नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचा दौरा हा रद्द करण्यात आला असून शरद पवार हे बारामतीला रवाना झाले आहे. तसंच, पुन्हा राहिलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे आश्वासनही पवार यांनी दिले आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या