अशोक चव्हाण राजीनाम्याची भाषा का करतायत ?

अशोक चव्हाण राजीनाम्याची भाषा का करतायत ?

काँग्रेसमध्ये एकूणच काही आलबेल नाही हे आता स्पष्टपणे समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष आणि बड्या नेत्यांमधल्या बेदिलीमुळे काँग्रेसचीच अवस्था बिकट झाली आहे. पक्षातले बडे नेते अशोक चव्हाण यांच्यावर नाराज आहेत.

  • Share this:

सागर कुलकर्णी

मुंबई, 23 मार्च : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये चंद्रपूरच्या एका कार्यकर्त्याशी बोलताना अशोक चव्हाण यांनी, मीच राजीनामा देण्याच्या मन: स्थितीत आहे, असं म्हटलं आहे.

काँग्रेसमध्ये मुकुल वासनिक यांचीच चलती असल्याचीही त्यांची तक्रार आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्यानं पक्षात माझं कुणीच ऐकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध काँग्रेस नेते अशी स्थिती निर्माण झाली आहे.

चंद्रपूरच्या उमेदवारीवरून वाद

औरंगाबादमधून माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना उमेदवारी हवी होती पण त्यांच्याऐवजी सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे.औरंगाबादमधून आपली पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, असं अशोक चव्हाण यांचं म्हणणं आहे पण ते पक्षातल्या नेत्यांना मान्य नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

चंद्रपूरच्या जागेवरही विनायक बांगडे यांच्या उमेदवारीमुळे नरेश पुगलिया नाराज आहेत पण चंद्रपूरचा उमेदवार ठरवताना आपलं मत विचारात घेतलं नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. त्यांचा रोख मुकुल वासनिक यांच्यावरच होता. अशोक चव्हाण यांच्या उमेदवाराला तिथे डावलण्यात आलं, अशी चर्चा आहे.

2 माजी मुख्यमंत्र्यांमध्ये वाद

कराडच्या जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. कराड विधानसभेत अशोक चव्हाण यांनी जास्त लक्ष घातलंय आणि विलासकाका पाटील उंडाळकर यांना जवळ करून पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर होतोय.

पुणे, सांगली या जागांच्या वाटपात राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालेल्या चर्चांवरूनही पक्षनेते आणि कार्यकर्ते अशोक अशोक चव्हाणांवर नाराज आहेत. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांचे वारसदार प्रतीक पाटील उमेदवारी घ्यायला तयार नाहीत. तिथे विश्वजीत कदम विरुद्ध प्रतीक पाटील अशी पक्षांतर्गत गटबाजी सुरू आहे.

पुण्यामध्ये उमेदवार कोण ?

पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्याविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार कोण हेही अजून ठरलेलं नाही. पक्षातल्या नेत्यांमधले आपापसातले वाद हेच याला कारणीभूत आहेत.

काँग्रेसमधल्या वादाचं मोठं कारण ठरलं ती नगरची जागा.नगरच्या जागेवरून काँग्रेसला राष्ट्रवादीसमोर हार मानावी लागली आणि मग सुजय विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यावरूनही उलटसुलट चर्चा झाल्या.

रत्नागिरीमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिल्याचा ठपकाही अशोक चव्हाण यांच्यावरच आहे. बांदिवडेकर 'सनातन' संबंधित असल्याचे आरोप झाल्यानंतर त्याबदद्ल योग्य निर्णय घेण्यात येईल,असं अशोक चव्हाण म्हणाले. तरीही बांदिवडेकर यांच्या उमेदवारीबद्दल पक्षाने अधिकृतरित्या निर्णय घेतलेला नाही.

या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसमध्ये एकूणच काही आलबेल नाही हेच समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष आणि बड्या नेत्यांमधल्या बेदिलीमुळे काँग्रेसचीच अवस्था बिकट झाली आहे.

=====================================================================================

निवडणुकीआधीच अशोक चव्हाणांच्या 'या' ऑडिओ क्लीपने उडाली खळबळ

First published: March 23, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading